आरटीआय कार्यकर्त्याचा ठिय्या
By Admin | Updated: April 1, 2017 05:31 IST2017-04-01T05:31:35+5:302017-04-01T05:31:35+5:30
माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती पूर्णपणे देण्यास टाळाटाळ केल्याने माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सत्यजित

आरटीआय कार्यकर्त्याचा ठिय्या
कल्याण : माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती पूर्णपणे देण्यास टाळाटाळ केल्याने माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सत्यजित बर्मन यांनी गुरुवारपासून कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अधिकारी जोपर्यंत पूर्णपणे माहिती देत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा बर्मन यांनी दिला.
अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखाने सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते थेट वालधुनी नदीत सोडतात. त्यामुळे नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे. महापालिकेचा मलनि:सारण प्रकल्प व आनंदनगर औद्योगिक परिसरातील रासायनिक कारखान्यांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद होता. तरीही, सांडपाणी नदीपात्रात सोडले जात होते. प्रदूषणास जबाबदार असलेल्या कारखानदारांवर काय कारवाई केली, त्याचबरोबर गुजरातच्या पर्यावरण सुरक्षा संस्थेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये दिलेल्या सुनावणीनुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात यावी, असा देशव्यापी निकाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी सहा महिन्यांच्या आत केली जावी, असे न्यायालयाने सूचित केले होते. त्यानुसार, काय अंमलबजावणी केली, याचीही माहिती बर्मन यांनी माहितीच्या अधिकारात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयास विचारली होती.
६ मार्चला माहिती अधिकाराचा अर्ज स्वत: बर्मन यांनी कार्यालयास सादर केला होता. त्यावर, २२ मार्चला माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले. परंतु, त्यांना अर्धवट माहिती दिली गेली. उर्वरित माहितीसाठी त्यांना पुन्हा कार्यालयात प्रत्यक्ष येण्यास सांगितले. ते सोमवारी कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना माहितीच्या अधिकारातील माहितीची फाइल पाहून घ्या. झेरॉक्स मशीन खराब आहे, असे कारण देण्यात आले. (प्रतिनिधी)
नोटीस कोणाला?
प्रदूषणास जबाबदार असलेल्या कोणत्या कारखान्यांना बंदीची नोटीस बजावली आहे, याची माहिती बर्मन यांना हवी होती. हीच माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने बर्मन यांनी माहिती आताच द्या, अन्यथा कार्यालय सोडणार नाही, असा इशारा देत त्यांनी ठिय्या दिला.