‘जनलक्ष्मी’ची १८ लाखांची रोकड लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:47 IST2017-08-19T02:47:30+5:302017-08-19T02:47:32+5:30
जनलक्ष्मी फायनान्स कंपनीची १८ लाखांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास शहरातील सागावमध्ये घडली.

‘जनलक्ष्मी’ची १८ लाखांची रोकड लुटली
डोंबिवली : मानपाडा रोडवरील कुंडलिक दर्शन या इमारतीमधील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीची १८ लाखांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास शहरातील सागावमध्ये घडली. या घटनेत कंपनीचे कर्मचारी सुमित अहिरे (रा. राजेश निवास, डोंबिवली पश्चिम) हे जखमी झाले. वर्दळीच्या ठिकाणी आणि दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
जनलक्ष्मी फायनान्स कंपनीची रोकड नेली जात असताना इमारतीखाली दबा धरून बसलेल्या दोघांनी अहिरे यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांनी त्यांच्याकडील बॅग हिसकावली. त्या वेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोरांनी सुमितच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात सुमित खाली पडले, तेवढ्यात लुटारूंनी लाखोंची रोकड असलेली बॅग लुटून पोबारा केला. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी इमारतीनजीकच्या गल्लीतून पळ काढला. त्यामुळे ते नेमके कोणत्या दिशेला गेले, याबाबतची माहिती पोलिसांनाही मिळू शकलेली नाही.
अहिरे यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत फायनान्स कंपनीने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.