डोंबिवलीत शिवसेना-काँग्रेसमध्ये राडा
By Admin | Updated: October 28, 2015 23:19 IST2015-10-28T23:19:06+5:302015-10-28T23:19:06+5:30
पैशांचे वाटप करण्यासाठी आल्याच्या संशयावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात डांबवून मारहाण केल्याची घटना

डोंबिवलीत शिवसेना-काँग्रेसमध्ये राडा
कल्याण : पैशांचे वाटप करण्यासाठी आल्याच्या संशयावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात डांबवून मारहाण केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली-त्रिमूर्तीनगरमध्ये मंगळवारी रात्री १० च्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीवरून काँग्रेसच्या ८ ते १० कार्यकर्त्यांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
पाथर्ली गावठाण या प्रभागातील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी शांताराम बनसोडे हे मुंबईतील पदाधिकारी व काही कार्यकर्त्यांसह डोंबिवलीत आले आहेत. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास त्रिमूर्तीनगर येथून प्रचार संपवून ते परतत असताना सात ते आठ जणांनी त्यांना तुम्ही कोण आहात, कोठून आलात, अशी विचारणा केली. बनसोडे यांनी त्यांना ओळख न दाखविल्याने त्यांना परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयात नेऊन तुम्ही पैसेवाटप करण्यासाठी आला आहात, असा आरोप करून त्यांना आणि कार्यकर्त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे. याप्रकरणी महादेव भगत, कपिल हिंगोले आणि दशरथ म्हात्रे यांच्यासह अन्य काँग्रेसच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)