Roof plaster collapses in Dombivali center | अग्निशमन जवानांचेही जीव टांगणीला! डोंबिवली केंद्रातील छताचे प्लास्टर कोसळले
अग्निशमन जवानांचेही जीव टांगणीला! डोंबिवली केंद्रातील छताचे प्लास्टर कोसळले

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात धोकादायक इमारतींचे सज्जे आणि घरातील छताचे प्लास्टर कोसळून जीवितहानी होत आहे. या दुर्घटनांवेळी मदतीसाठी धावून जाणारे अग्निशमन जवानांचे जीवही धोक्यात असल्याचे दिसत आहे. डोंबिवली अग्निशमन केंद्रामधील अधिकाऱ्याच्या खोलीमधील छताला असलेले प्लास्टर कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. केंद्रामधील छतामधून आणि भिंतींमध्ये पावसाचे पाणी झिरपत असल्याने येथील अधिकाऱ्यांसह जवानांचा जीव टांगणीला लागला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अतिधोकादायक बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला असताना महापालिकेच्या स्वत:च्या वास्तूही सुस्थितीत नसल्याचेच या घटनेनंतर उघड झाले आहे. शहरातील बांधकाम धोकादायक आणि अतिधोकादायक म्हणून जाहीर करताना आपल्या सफाई कामगारांच्या जीर्ण झालेल्या वसाहती तसेच गळक्या प्रभाग कार्यालयांची दुरुस्ती करायला प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. शहरातील अन्य धोकादायक बांधकामांना पाडण्यासंदर्भात नोटिसा बजावून स्वत:च्या वास्तूंकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ याची प्रचीती याठिकाणी आल्यावाचून राहत नाही. डोंबिवलीतील अग्निशमन केंद्र महापालिकेच्या स्थापनेपासूनच १९८३ ला सुरू करण्यात आले. प्रारंभी एमआयडीसीची गरज म्हणून उभारलेल्या या केंद्रातून कालांतराने संपूर्ण शहरात सेवा दिली जात आहे. या केंद्राचे बांधकाम साधारण १९७९-८० मधील असून येथे एकूण सात खोल्या आहेत. २००८-०९ मध्ये केंद्राची डागडुजी करण्यात आली होती. पण त्यानंतर देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या या केंद्रात बहुतांश ठिकाणी भिंतींमधून पावसाचे पाणी झिरपत असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यात येथील अग्निशमन केंद्र प्रमुख सुरेश शिंदे यांच्या कार्यालयातील छताला असलेले प्लास्टर कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

तीन शिफ्टमधील नऊ अधिकारी आणि जवान असतात. या घटनेत कोणालाही इजा झालेली नसली तरी सध्याची केंद्राची अवस्था पाहता जीव मुठीत धरूनच वावरावे लागत आहे. याबाबत ९ जून २०१९ ला मुख्य अग्निशमन अधिकारी, संबंधित खात्याचे उपायुक्त आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्रव्यवहार केला आहे; पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडताच अभियंत्यांनी केंद्राला भेट देऊन पाहणी केल्याचे सांगण्यात आले.

आपल्याच कर्मचाºयांकडे दुर्लक्ष : महापालिकेचे अनेक भूखंड महसूल विभागासाठी देण्यात आले आहेत. सुसज्ज अशा या जागा आहेत. आपल्या कर्मचाºयांची सुरक्षा दुरवस्थेमुळे धोक्यात आली असताना महापालिकेचे त्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. ज्या जागा इतर प्राधिकरणांसाठी देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून भाडेही वसूल केले जात नसल्याचा मुद्दा वर्षभरापूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी उपस्थित केला होता. तसेच या जागा तत्काळ ताब्यात घ्या, असे आदेशही जारी केले होते. पण आजतागायत ठोस कृती झालेली नाही.

‘ती’ कार्यवाही केवळ कागदावरच : आधारवाडीतील मुख्य केंद्राची धोकादायक अवस्थेत असलेली इमारत दुरुस्त करावी. यासंदर्भात तीन वर्षांपासून नगरसेवक मोहन उगले यांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत कामाची फाइलही बनविण्यात आली. पण निधीअभावी त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याची चर्चा आहे. या धोकादायक अवस्थेतील केंद्रातील मुख्यालय चिकणघर परिसरात हलविण्यात आले आहे. आधारवाडीतील केंद्र ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. अधिकारी मुख्यालयात गेले असताना येथील कर्मचाºयांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी दिली.


Web Title: Roof plaster collapses in Dombivali center
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.