उल्हासनगरमधील रस्ते होणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST2021-08-28T04:45:05+5:302021-08-28T04:45:05+5:30
उल्हासनगर : शहरातील विविध रस्ते व क्रीडा संकुलासाठी १७६ कोटींचा निधी शासनाकडून महापालिकेला मिळाल्याची माहिती महापौर कार्यालयात शहरप्रमुख राजेंद्र ...

उल्हासनगरमधील रस्ते होणार चकाचक
उल्हासनगर : शहरातील विविध रस्ते व क्रीडा संकुलासाठी १७६ कोटींचा निधी शासनाकडून महापालिकेला मिळाल्याची माहिती महापौर कार्यालयात शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे व अरुण अशान यांनी दिली. महापालिका निवडणुकीपूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याचा विश्वास धनंजय बोडारे यांनी व्यक्त केला.
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक येणाऱ्या फेब्रुवारीत होणार असून, सत्ताधारी शिवसेनेने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शासनाकडून विविध विकासकामांसाठी आलेल्या निधीची माहिती महापौर लीलाबाई अशान यांच्या कार्यालयात शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, अरुण अशान यांनी दिली. शासन व एमएमआरडीएअंतर्गत १०१.८२ कोटींच्या निधीतून मोर्यानगरी ते व्हीनस चौक रस्त्यासाठी ५२.११ कोटी, डॉल्फिन हॉटेल ते ए ब्लॉक २६.०२ कोटी, सोनार रस्ता ते कोयंडे पुतळा ७.११, हिराघाट ते ड्रबी हॉटेल ४, पवई चौक ते विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता १२.५० कोटी आदी रस्ते बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच यापूर्वी ४९.७८ कोटी विविध रस्त्यांसाठी व व्हीटीसी मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने २५ कोटींच्या निधीतून क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी सर्व विकासकामांना सुरुवात होणार असल्याची माहिती अरुण अशान यांनी दिली.
खड्डेमुक्त शहराचा मानस
शहरातील ७० टक्के रस्ते सिमेंट काँक्रिटचे असून, उर्वरित ३० टक्के रस्ते लवकरच सिमेंट काँक्रिटचे होणार आहेत. शहर खड्डेमुक्त करण्याचा मानस शिवसेनेचा असल्याची माहिती अरुण अशान म्हणाले. महापालिका निवडणुकीपूर्वी शहर विकासासाठी मोठा निधी आणणार असल्याचे संकेत त्यांनी पत्रकार परिषदेत दिले. पत्रकार परिषदेला शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज, दिलीप गायकवाड आदी उपस्थित होते. १७६ कोटींच्या निधीतून विकास कामे निवडणुकीपूर्वी होणार असून, शिवसेनेने करून दाखविले, असे बोडारे म्हणाले.