स्टार प्रचारकांसह ‘रोड शो’चा धुरळा
By Admin | Updated: February 14, 2017 02:42 IST2017-02-14T02:42:54+5:302017-02-14T02:42:54+5:30
युती तुटली आणि आघाडी झाली असे जरी चित्र ठाण्यात असून येत्या काही दिवसात प्रचार सभांचा धुराळा ठाण्यात उडण्यास सुरुवात होणार आहे.

स्टार प्रचारकांसह ‘रोड शो’चा धुरळा
ठाणे : युती तुटली आणि आघाडी झाली असे जरी चित्र ठाण्यात असून येत्या काही दिवसात प्रचार सभांचा धुराळा ठाण्यात उडण्यास सुरुवात होणार आहे. सेंट्रल मैदानात यापुढे सभा घेण्यात येणार नसल्याने विविध राजकीय पक्षांनी गावदेवी मैदान, शिवाजी आणि हायलॅन्ड गार्डन मैदांनाना प्राधान्य दिले आहे. या मैदांनामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मनेसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांच्या प्रचार सभा आणि रोड शो ठाण्यात होणार आहेत.
सेना आणि भाजपा स्वबळावर लढत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी असली तरी काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. मनसेने यापूर्वीच एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता प्रचार आणि रोड शो साठी ठाण्यात डेरेदाखल होणार आहे. ठाण्यासह राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळेस लागल्याने आवडत्या नेत्याला ठाण्यात आणण्यासाठी प्रत्येक पक्षाची कसोटी लागणार आहे.
राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, धनजंय मुंडे यांच्या सभा होणार आहेत. सेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक सभा, आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. तसेच शहरातील इतर जिल्ह्यातील राहणाऱ्या मतदारांचा विचार करुन उत्तर महाराष्ट्राचे गुलाबराव पाटील, कोकणातील दीपक केसरकर, राजन साळवी, भरतशेठ गोगावले, मराठवाड्यातील चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर, कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर, नितीन बानुगडे पाटील आदी नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरविले जाणार आहे. तर भाजपकडून केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा निश्चित आहेत. (प्रतिनिधी)