रस्ता रुंदीकरणातील बाधित उघड्यावर

By Admin | Updated: December 23, 2016 03:07 IST2016-12-23T03:07:12+5:302016-12-23T03:07:12+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण-शीळ मार्गावर केलेल्या कारवाईत रहिवासी आणि व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले.

Road obstructed open on the open | रस्ता रुंदीकरणातील बाधित उघड्यावर

रस्ता रुंदीकरणातील बाधित उघड्यावर

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण-शीळ मार्गावर केलेल्या कारवाईत रहिवासी आणि व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. महापालिका प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांवर अन्याय झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्र्रेसने केला आहे.
महापालिकेने नागरिकांना कोणत्याही नोटिसा न देता कारवाई केली आहे. कारवाईसाठी मार्किंगही केलेले नव्हते. त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले, असा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे. तोडलेल्या जागेच्या बदल्यात जागा व नियमानुसार भरपाई तत्काळ द्यावी. व्यावसायिकांना त्यांच्या नुकसानीनुसार एफएसआय तसेच टीडीआर द्यावा. घरे गेलेल्यांना निवारा द्यावा. बांधकामे तोडताना जेवढी तत्परता दाखवली, तेवढीच भरपाई देतानाही दाखवावी. त्यात दिरंगाई करू नये, असेही ते म्हणाले.
नोटाबंदीमुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यांच्याकडे घरे, दुकानांची डागडुजी करायलाही पैसे नाहीत. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. नियोजन न करता कारवाई कशी केली, असा सवाल सुधीर वंडार पाटील यांनी केला आहे.
बाधितांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. ही बांधकामे महापालिका स्थापन होण्यापूर्वी झाली आहेत. बहुतांशी कामांना ग्रामपंचायतीची मान्यताही आहे, असे पाटील म्हणाले. महिनाभरात बाधितांना न्याय न मिळाल्यास पक्षातर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Road obstructed open on the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.