नाल्यावरील रस्ताही ‘श्रेया’ने बाधित

By Admin | Updated: November 15, 2016 04:34 IST2016-11-15T04:34:47+5:302016-11-15T04:34:47+5:30

आधी मोठ्या प्रकल्पाच्या कामावरून शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला होता. परंतु, आता नाल्यावरील पादचारी रस्त्याच्या कामाच्या

The road on the Nullah was interrupted by 'Shreya' | नाल्यावरील रस्ताही ‘श्रेया’ने बाधित

नाल्यावरील रस्ताही ‘श्रेया’ने बाधित

ठाणे : आधी मोठ्या प्रकल्पाच्या कामावरून शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला होता. परंतु, आता नाल्यावरील पादचारी रस्त्याच्या कामाच्या किरकोळ श्रेयवादावरून शिवसेना-भाजपामध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. मुलुंड हद्दीजवळील नाल्यावर पादचारी रस्ता बनवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यासाठी एक कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली. त्याचे भूमिपूजनदेखील झालेले आहे. परंतु, आता शिवसेनेने याच कामाचे फलक लावून हे काम आमदार निधीतून मंजूर झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता या भागात तणावाचे वातावरण असून शिवसेना-भाजपा हे सत्ताधारी मित्रपक्ष पुन्हा आमनेसामने आले आहेत.
मागील २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रभाग क्रमांक ३२ मधील भटवाडी येथील मुलुंड हद्दीलगत वाहणाऱ्या नाल्याचे श्रीनगर मेला बार, निशिगंध सोसायटी, काळूशेठ चाळ, प्रियदर्शनी बिल्डिंगमार्गे तानसा जलवाहिनीपर्यंत आरसीसी पद्धतीने बांधकाम करून मेला बार ते प्रियदर्शनी बिल्डिंगपर्यंत स्लॅब टाकून पादचारी रस्ता बनवण्याचा प्रस्ताव पाठपुरावा करून मंजूर करून घेतला असल्याचा दावा तत्कालीन नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी केला आहे. या कामासाठी ठामपाने २०१५-१६ साठी एक कोटी ४० लाखांची तरतूद केली आहे. तर, २०१६-१७ मध्ये यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. २० जानेवारी २०१६ च्या महासभेत यासंदर्भातील ठराव सर्वानुमते मंजूरही झाला असल्याचे त्यांचे म्हणणे असून त्याची निविदा प्रक्रि याही मे महिन्यात पूर्ण झाली होती. परंतु, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भूमिपूजन रखडले. त्याचे उद्घाटन शनिवारी भाजपाचे ठाणे विभागीय उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी तेथील सध्याच्या नगरसेविका स्वाती देशमुख आणि नागरिकांच्या उपस्थितीत केले. मात्र, सोमवारी शिवसेनेने पुन्हा भूमिपूजन करीत या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप घाडीगावकर यांनी केला. विशेष म्हणजे रविवारी महापौर संजय मोरे यांच्या हस्ते आणि सेना नगरसेवकांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदारांच्या निधीतून काम झाल्याचा फलक लावून त्यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचेही घाडीगावकर यांनी म्हटले आहे. महापालिकेने एखादा प्रस्ताव मंजूर करून त्यासाठी तरतूद केली असेल, तर त्याच कामासाठी आमदार निधी कसा मिळू शकतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या आमदार निधीबाबत झालेल्या कार्यवाहीचे दस्तऐवज जनतेसमोर जाहीर करावेत, असे आव्हान घाडीगावकरांनी दिले आहे. अशाच पद्धतीने जय भवानीनगर ते श्रीनगर जलकुंभाकरिता थेट जलवाहिनीचे भूमिपूजन सेनेने खोटेपणाने केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The road on the Nullah was interrupted by 'Shreya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.