पावसाळ्यात अपघातांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:11 IST2019-06-10T00:11:33+5:302019-06-10T00:11:50+5:30

रस्त्यांची पातळी असमान : पेव्हरब्लॉकही खचले, प्रशासनाचे दुर्लक्ष

The risk of accidents in monsoons | पावसाळ्यात अपघातांचा धोका

पावसाळ्यात अपघातांचा धोका

कल्याण : पश्चिमेतील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शिवाजी चौकात मागील वर्षी रस्त्याच्या असमान पातळीमुळे दोघांचा बळी गेला होता. मात्र, या घटना घडल्यानंतरही संबंधित प्रशासकीय यंत्रणेला अद्याप जाग आलेली नाही. शहरात अन्य ठिकाणीही खचलेले पेव्हरब्लॉक, काँक्रिट अथवा डांबरी रस्त्याची पातळी समान नसलेले चित्र पाहता यंदाही पावसाळ्यात अपघाताचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांची लांबी ५३२ किलोमीटर आहे. महापालिका हद्दीतील ३२ किलोमीटर रस्त्यांचेच काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे उर्वरित ५०० किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरी आहेत. काही ठिकाणी या डांबरी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यातच, काँक्रिटीकरणाची कामेही योग्य प्रकारे झालेली नाहीत. पेव्हरब्लॉकच्या वापरामुळे रस्त्यांची पातळी समान न राहिल्याने चढउतार आहेत. त्याचबरोबर जागोजागी टाकलेले पेव्हरब्लॉक खचल्याने त्याची जागा खड्ड्यांनी घेतली आहे. त्यामुळे काँक्रिटच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करतानाही वाहनचालकांना जिकिरीचे होऊन बसले आहे.
गेल्या वर्षी शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांच्या असमतोलपणामुळे आरोह आतराळे (७) याचा नाहक बळी गेल्याची घटना २ जूनला घडली. तर, ७ जुलैला त्याच ठिकाणी मनीषा भोईर यांना जीव गमवावा लागला होता. व्यापाऱ्यांनी रस्त्याची पातळी समान नसल्याने याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे केडीएमसी प्रशासनाला सांगितले होते.
प्रशासनाने वेळीच लक्ष घातले असते, तर ते अपघात टळले असते. परंतु, दोन बळी जाऊनही त्या चौकातील परिस्थिती जैसे थे आहे. रस्ता काँक्रिट असो अथवा डांबरी, त्याच्या अवतीभोवती सर्रासपणे पेव्हरब्लॉक टाकले जातात. परंतु, वाहनांच्या सततच्या येजा करण्याने पेव्हरब्लॉक खचतात. उंचसखल भाग निर्माण झाल्याचे चित्र आग्रा रोडवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

ड्रेनेजच्या झाकणांभोवती खड्डे
कल्याण आणि डोंबिवली शहरांत बहुतांश ठिकाणी रस्त्यांवर बसवलेले पेव्हरब्लॉक खचल्याने आणि उखडले गेल्याने ड्रेनेजची झाकणेही खोलवर गेली आहेत. त्यामुळे तेथे खड्डेमय स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात त्यात पाणी भरून खोलीचा अंदाज येणार नाही आणि यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The risk of accidents in monsoons