ठाणे : रिक्षावर झाड पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ठाण्यातील नौपाडा येथील दमानी इस्टेट येथे घडली. मात्र, या घटनेत रस्त्याच्या कडेला उभा असलेला दुसऱ्याच रिक्षाचा चालक जयराम यादव (३५) हा जखमी झाला आहे.
दमानी इस्टेट परिसरातील दत्तमंदिर येथे गुरुवारी दुपारी रांगेत रिक्षा उभ्या होत्या. या वेळी तेथील रस्त्यालगतचे सुकलेले झाड अचानक रिक्षाचालक राजेंद्र तिवारी यांच्या रिक्षावर पडले. त्यामुळे त्यांच्या रिक्षाचे नुकसान झाले. तसेच रिक्षा सोडून उभा असलेला नवी मुंबईतील रिक्षाचालक यादव हादेखील त्यात जखमी झाला. त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याने त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेची माहिती कळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली. या वेळी १ फायर वाहन आणि १ रेस्क्यू वाहन पाचारण केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.
--------------