रिक्षाचालकांच्या आर्थिक मदतीची वेबसाईट होते हँग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:13+5:302021-05-25T04:45:13+5:30
कल्याण : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र, त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया एक ...

रिक्षाचालकांच्या आर्थिक मदतीची वेबसाईट होते हँग
कल्याण : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र, त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया एक महिन्यानंतर सुरू झाली आहे. त्यासाठी सरकारच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. मात्र, ही वेबसाईट सारखी हँग होत असल्याने रिक्षाचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोजी बंद असली तरी रोटी बंद होणार नाही, असे सांगून हातावर पोट असलेल्यांना जवळपास चार हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. रिक्षाचालकांच्या खात्यात प्रत्येकी १,५०० रुपये जमा करण्यात येतील, असे सांगितले. परंतु, ही मदत तुटपुंजी आहे. पहिल्या लॉकडाऊनचा कालावधी हा १५ ते ३० एप्रिल होता. प्रत्येक दिवसाला १०० रुपये याप्रमाणे १,५०० रुपये, अशा स्वरूपात ही मदत होती. मात्र, नंतर हा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने ३० मे पर्यंत वाढविण्यात आला.
सरकारने १५ एप्रिलच्या आधी केलेल्या घोषणेनुसार पैसे रिक्षाचालकांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरूच झाली नाही. वेबसाईट बनविण्यात एक महिना गेला. आता वेबसाईट तयार झाल्यावर रविवारपासून रिक्षाचालकांनी मदतीसाठी कागदपत्रासह नोंदणी सुरू केली आहे. मात्र, वारंवार ही वेबसाईट हँग होत आहे. सोमवारी सकाळी तांत्रिक कारणांमुळे वेबसाईट दोन तास हँग होती. राज्यभरातून रिक्षाचालक एकाच वेळी ऑनलाईन कागदपत्रे सादर करीत असल्याने ही वेबसाइट हँग होते. ही समस्या येऊ नये, यासाठी सरकारने काळजी घेतली पाहिजे, अशी मागणी रिक्षाचालक-मालक संघटनेचे कल्याणचे पदाधिकारी संतोष नवले यांनी केली आहे.
आतापर्यंत ७० जणांचीच नोंदणी
- राज्यभरातील १,५०० रुपये मदतीच्या लाभार्थी रिक्षाचालकांची संख्या आठ लाख १२ हजार आहे. त्यापैकी कल्याण आरटीओ हद्दीत ६० हजार रिक्षाचालक आहेत. परंतु, आतापर्यंत ७० रिक्षाचालकांची नोंदणी झाली आहे. वेबसाईट सारखी हँग होत असल्याने प्रसंगी ऑफलाईन प्रक्रिया राबवावी, जेणेकरून रिक्षाचालकांना लवकर मदत मिळेल.
- लॉकडाऊनमुळे सायबर कॅफे उघडत नाहीत. अनेक रिक्षाचालकांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती नाही. कल्याण रिक्षाचालक-मालक संघटनेच्या कार्यालयातून रिक्षाचालकांची माहिती वेबसाईटवर अपलोड केली जात आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येतील रिक्षाचालकांचे ऑनलाईन काम एकाच संगणकावरून करणे शक्य होणार नाही. या अडचणी सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत, याकडे रिक्षाचालकांनी लक्ष वेधले आहे.
-----------------------