संतप्त डोंबिवलीकर प्रवाशांनी अडवल्या रिक्षा
By Admin | Updated: June 29, 2017 22:16 IST2017-06-29T22:16:19+5:302017-06-29T22:16:19+5:30
रिक्षाचालकांच्या असंख्य तक्रारी असल्याने डोंबिवलीकरांनी रिक्षा अडवून संताप व्यक्त केल्याची घटना गुरुवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास केळकर रोडवर घडली.

संतप्त डोंबिवलीकर प्रवाशांनी अडवल्या रिक्षा
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 29 - वेळेत रिक्षा मिळत नाहीत, लांबचे भाडे आकारण्यास रिक्षाचालक जास्त इच्छुक असतात, जवळचे भाडे नाकारले जाते अशा रिक्षाचालकांच्या असंख्य तक्रारी असल्याने डोंबिवलीकरांनी रिक्षा अडवून संताप व्यक्त केल्याची घटना गुरुवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास केळकर रोडवर घडली.
त्यामुळे वातावरण काही काळ तणावाचे झाले होते. गुरुवारी रात्री लोकलच्या गर्दीतून त्रस्त झालेल्या प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत रिक्षाचालकांच्या मुजोरीचा खरपूस समाचार घेतला. मनमानी कारभाराबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त करत रिक्षा अडवून भाडे नाकारण्याबाबत जाब विचारला.
घटनास्थळी तातडीने ट्रॅफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गंभिरे यांनी प्रवाशांची समजूत काढली. ते म्हणाले की, संध्याकाळी रस्त्यावर 60 टक्के रिक्षा असतात. त्यातही पावसामुळे सगळेच व्यवसाय करत नाहीत. ही करणे असली तरी भाडे कोणीही नाकारू शकत नाही. प्रवाशांची सोय महत्वाची, असे म्हणत त्यांनी रिक्षाचालकांनाही कारवाईचा बडगा दाखवत भाडे घ्यायला लावले. त्यामुळे सुमारे 10 मिनिटे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.