पावसामुळे शहापूरमध्ये भातशेती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:30 IST2019-09-18T00:30:36+5:302019-09-18T00:30:39+5:30
शहापूर तालुक्यात यावर्षी अधिक पाऊस पडत असून अजूनही पावसाचा जोर कायम आहे.

पावसामुळे शहापूरमध्ये भातशेती धोक्यात
भातसानगर : शहापूर तालुक्यात यावर्षी अधिक पाऊस पडत असून अजूनही पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा शेतीवर परिणाम झाला आहे. चार महिन्यांपासून नदी ,नाले,ओढे, शेत तुडुंब भरून वाहत आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये पावसाच्या हुलकावणीमुळे भातशेतीला आवश्यक असलेला पाऊस न मिळाल्याने निम्मी पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी परिस्थिती उलट असून निम्यापेक्षा अधिक भातपिके ही भाताच्या लोंब्या बाहेर पडूनही पाण्यात आहेत. तर काही दाणा तयार होऊन कडक उन्हाच्या प्रतीक्षेत आहेत. जर या भातपिकाला आवश्यक ऊन मिळाले नाही तर मात्र उरली सुरली पिकेही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
मागीलवर्षी भातसा धरण क्षेत्रात २०१७ मिलीमीटर पाऊस पडला होता यावर्षी हे प्रमाण ३ हजार ९६७ मिलीमीटर इतके असून ते येत्या काही दिवसात वाढणार आहे.
शहापूर परिसरात आजपर्यंत ३ हजार ४६० मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली असून मागीलवर्षी ती २ हजार १२ मि.मी होती. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राजेंद्र म्हसकर यांनी केली आहे.