बदलापूरात मुलाकडून आईची हत्या
By Admin | Updated: July 4, 2017 18:05 IST2017-07-04T18:05:40+5:302017-07-04T18:05:53+5:30
बदलापूरात एका दारुड्या मुलाने दारुच्या नशेत आपल्या वृद्ध आईची हत्या केली आहे. 3 जुलै रोजी ही घटना घडली असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

बदलापूरात मुलाकडून आईची हत्या
>ऑनलाइन लोकमत
बदलापूर, दि. 04 - बदलापूरात एका दारुड्या मुलाने दारुच्या नशेत आपल्या वृद्ध आईची हत्या केली आहे. 3 जुलै रोजी ही घटना घडली असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
बदालपूर मांजर्ली भागातील दिपाली पार्क इमारतीत विजय शिंदे हा आपली आई शकुंतला शिंदे (70) यांच्यासोबत राहत होता. विजय हा दारूच्या व्यसनी गेल्याने त्याचे कुटुंबातील इतर भावंडांसोबत आणि नातेवाईकांसोबत पटत नव्हते. त्यामुळे तो आईसोबत बदलापूरातच राहत होता. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमध्ये तो वाहक म्हणून काम करीत होता. 3 जुलै रोजी जेवण बनवितांना आई आणि मुलामध्ये कडाक्याचे भांडण सुरु झाले. आधीच दारुच्या नशेत असलेल्या विजयने रागाच्या भरात आपल्या आईचे डोके जमिनीवर आपटले. त्यामुळे डोक्यावर जोरदार मार लागल्याने वृद्ध आईचा जागीच मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती शेजा-यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी हा प्रकार तपासल्यावर आरोपी विजय यानेच ही हत्या केल्याचे समोर आले.
विजयचा मोठा भाऊ संजय शिंदे याच्या फिर्यादीवरुन बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र आगरकर यांच्या पथकाने आरोपी विजयला अटक केली आहे.