गावदेवी मैदान पूर्ववत करा,अन्यथा भूमिगत पार्किंग सुरु होऊ देणार नाही; भाजपचा इशारा

By अजित मांडके | Updated: November 8, 2022 15:43 IST2022-11-08T15:43:15+5:302022-11-08T15:43:35+5:30

गावदेवी भूमिगत पार्कीगचे काम आणि येथील मैदानाचे कामही अंतिम टप्यात आले असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

Restore Gadevi ground otherwise underground parking will not be allowed to start warns BJP | गावदेवी मैदान पूर्ववत करा,अन्यथा भूमिगत पार्किंग सुरु होऊ देणार नाही; भाजपचा इशारा

गावदेवी मैदान पूर्ववत करा,अन्यथा भूमिगत पार्किंग सुरु होऊ देणार नाही; भाजपचा इशारा

अजित मांडके (ठाणे)
ठाणे : स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी असलेला गावदेवी भूमिगत पार्किंगचे काम आणि येथील मैदानाचे कामही अंतिम टप्यात आले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र पूर्वीपेक्षा मैदानाचा आकार लहान झाला असून दीड वर्षे उलटूनही हे मैदान किंवा पार्किंग अद्यापही ठाणेकरांसाठी खुले झालेले नाही. त्यातही कामला उशिर केला म्हणून ठेकेदारावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई अद्याप पालिकेने केलेली नाही. त्यामुळे आधी गावदेवी मैदान पूर्वी जसे होते, तसे पूर्ववत करुन ते नागरिकांसाठी खुले करा अशी मागणी भाजपच्या महिला ठाणे शहर अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी केली. मात्र मैदान खुले झाली नाही तर भूमीगत पार्किंगदेखील सुरु होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

मंगळवारी मृणाल पेंडसे यांच्यासह, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि सुनेश जोशी यांनी भूमिगत पार्कीग प्लाझा आणि मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. ७०० चौरस मीटरवर भुमीगत पार्कीगचे हे बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी १३० चार चाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत.  यासाठी २७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. एकीकडे भूमिगत पार्कीगची सुविधा उपलब्ध करुन दिली जात असतांना दुसरीकडे आता येथील मैदानही पूर्वीप्रमाणे क्रीडा प्रेमींसाठी खुले केले जाणार असल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु २७ कोटी खर्च करुनही या पार्किंगचे किंवा मैदानाचे कामही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यात दीड वर्षापूर्वी पार्कीग व मैदान खुले होणे अपेक्षित परंतु अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. त्यात ठेकेदारावर पेनल्टी लावणे अपेक्षित असतांना त्याला कामाच्या मोबदल्यात ९० टक्के पेमेंट अदा करण्यात आल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

पूर्वी जसे मैदान होते, तसेच मैदान उपलब्ध करुन दिले जाईल असे पालिकेने सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात मैदानाचा आकार हा पूर्वीपेक्षा कमी झाला असून ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याचे पेंडसे यांनी सांगितले. मात्र जो पर्यंत येथील मैदान नागरीकांसाठी खुले होत नाही, तो पर्यंत पार्किंग सेवा देखील सुरु करु दिले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिला आहे.

Web Title: Restore Gadevi ground otherwise underground parking will not be allowed to start warns BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे