कल्याण परिमंडळात ६० हजार ७०० ग्राहकांच्या शंकांचे निवारण; हप्त्यांवर व्याजाची आकारणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:26 IST2020-07-09T16:25:54+5:302020-07-09T16:26:10+5:30
कल्याण परिमंडलात आतापर्यंत ६० हजार ८७४ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून हप्त्यांवर व्याजाची आकारणी नाही तीन महिन्यांचे वीजबिल मुदतीत व एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना २ टक्के सवलत देण्यात येणार असून ही सवलत जुलै महिन्याच्या वीजबिलात समायोजित केली जाईल.

कल्याण परिमंडळात ६० हजार ७०० ग्राहकांच्या शंकांचे निवारण; हप्त्यांवर व्याजाची आकारणी नाही
डोंबिवली: महावितरणच्या कल्याण परिमंडळात अधिक वीजबिलाबाबत तक्रारी घेऊन आलेल्या ६० हजार ७०० ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले असून शंका समाधान झाल्यानंतर ग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा वाढत आहे.
लॉकडाऊननंतर प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रिडींग व ग्राहकांच्या वीज वापरानुसार तीन महिन्यांचे एकत्रित व अचूक वीजबिल ग्राहकांना वितरित करण्यास जूनपासून सुरुवात झाली. त्यानंतर अधिक वीजबिलाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार ग्राहकांच्या शंका समाधानासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. कल्याण परिमंडळातील कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम, उल्हासनगर, बदलापूर, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, वसई, वाडा, आचोळे, विरार, नालासोपारा, बोईसर, डहाणू, जव्हार, पालघर, मोखाडा, सफाळे, विक्रमगड, तलासरी आदी सर्वच ४० उपविभागीय कार्यालयांकडून ४० वेबिनार, १० ग्राहक मेळावे व खुले चर्चासत्र, नोंदणीकृत मोबाईल, 'एसएमएस', व्हॉट्स अँप व प्रत्यक्ष संवादाद्वारे ग्राहकांना गेल्या तीन आठवड्यांपासून वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे.
कल्याण परिमंडलात आतापर्यंत ६० हजार ८७४ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून हप्त्यांवर व्याजाची आकारणी नाही तीन महिन्यांचे वीजबिल मुदतीत व एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना २ टक्के सवलत देण्यात येणार असून ही सवलत जुलै महिन्याच्या वीजबिलात समायोजित केली जाईल. तर तीन समान हप्त्यात वीजबिल भरण्याची मुभा ग्राहकांना देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण रकमेच्या एक तृतीयांश रक्कम भरणे आवश्यक आहे. उर्वरित रकमेवर व्याजाची आकारणी करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात येत आहे.