झाडे रुजवण्याचा संकल्प

By Admin | Updated: June 5, 2016 03:09 IST2016-06-05T03:09:12+5:302016-06-05T03:09:12+5:30

वन्यप्राण्यांच्या जतन-संवर्धनावर भर देत त्यांच्यासाठी पोषक पर्यावरण तयार करणे, त्यांच्या तस्करीला विरोध करण्यावर यंदाच्या पर्यावरण दिनी भर दिला जाणार असला, तरी ठाणे आणि आसपासच्या

Resolve to plant trees | झाडे रुजवण्याचा संकल्प

झाडे रुजवण्याचा संकल्प

ठाणे : वन्यप्राण्यांच्या जतन-संवर्धनावर भर देत त्यांच्यासाठी पोषक पर्यावरण तयार करणे, त्यांच्या तस्करीला विरोध करण्यावर यंदाच्या पर्यावरण दिनी भर दिला जाणार असला, तरी ठाणे आणि आसपासच्या परिसरातील विविध पर्यावरणवादी संस्थांनी यंदा रोपांपेक्षा बियांच्या लागवडीवर भर देण्याचे ठरवले आहे. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात रोपांची लागवड केली तर त्यांची जोपासना-संगोपन त्रासाचे ठरते. शिवाय अजून पावसाला सुरूवात झालेली नसल्याने रोपांनी मूळ धरमेही कठीण असते. त्यामुळे बियांची लागवड करत झाडे लावण्याची कल्पना मूळ धरावी आणि त्यातून पर्यावरण जतनाचा संदेश सर्वदूर पोचावा हा उद्देश त्यामागे आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडे लावणे, दिंड्या काढणे असे पर्यावरणाभिमुख उपक्रम सर्रास राबविले जातात. मात्र हरीत ठाण्यासाठी रोपे बनविणे, बियाणे रूजविणे आणि रोपटी लावणे हे काम गेली वर्षानुवर्षे सुरू ठेवले आहे ते ठाण्यातील हरियाली संस्थेने. नवी मुंबईतील तळोजा येथे रविवारी हरियालीच्याच मार्गदर्शनाखाली बियाणे रूजविण्यात येणार आहे.
पर्यावरणाचा ढासळलेला समतोल पाहता वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी ठाण्यात हरियाली संस्था २० वर्षापासून काम करत आहे. कासारवडवली येथील नर्सरीत, मुलुंड येथील नर्सरीत रोपे बनविण्याचे काम केले जाते, तर घोडबंदर येथील मुंदा डोंगरावर बियाणे रूजविण्यात येते. विशेष म्हणजे हरियालीचे काम पाहता ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली सोसायटीतील नागरिकांनीही हरियालीच्या सहकार्याने रोपे बनविण्याचे काम सुरू केले असून पाच हजाराहून अधिक रोपे तयारही झाली आहेत. त्याचबरोबर गांडूळ आणि जैविक खत बनविण्याचेही दोन प्रकल्प तेथे उभे राहिले आहेत. ही रोपे पहिला पाऊस पडल्यावर ठाण्यातील विविध डोंगराळ भागात लावली जातात. काही रोपे नागरिकांना विनामूल्यही दिली जातात, अशी माहिती हरियालीचे संस्थापक, अध्यक्ष पूनम सिंघवी यांनी दिली. (प्रतिनिधी)

३० हजार झाडे बहरली
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीनजीक असलेल्या लोनाड-भवाळे गावाजवळील डोंगरावरील २५ एकर जमिनीवर झाडे लावण्याचे उद्दिष्ट हरियालीने ठेवले होते. २००८ ते २०१५ या सात वर्षात या डोंगरावर सुमारे ३० हजार झाडे लावून हिरवळ निर्माण केली आणि आता तो डोंगर पुन्हा वनविभागाकडे सुपूर्द केला आहे.

Web Title: Resolve to plant trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.