२३ वर्षांपासून रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: June 3, 2016 01:53 IST2016-06-03T01:53:40+5:302016-06-03T01:53:40+5:30
ठाण्यात धोकादायक इमारती खाली करण्याच्या कामाला सुरु वात झाली असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसनही तत्काळ केले जात आहे.

२३ वर्षांपासून रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
ठाणे : ठाण्यात धोकादायक इमारती खाली करण्याच्या कामाला सुरु वात झाली असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसनही तत्काळ केले जात आहे. परंतु, दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील धोकादायक म्हणून पाडलेल्या दोन इमारतींमधील रहिवासी मागील २३ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची नसल्याने अनेक वर्षे पाठपुरावा करूनही त्यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता फार कमी आहे. विशेष म्हणजे पुनर्वसनाचे तोंडी आश्वासन देऊन पालिकेने या दोन्ही इमारतींवर २३ वर्षांपूर्वी हातोडा चालवला होता. त्यामुळे कायमस्वरूपी घरे गमावलेल्या या रहिवाशांवर ठाण्यातील वेगवेगळ्या झोपडपट्टीमध्ये राहण्याची वेळ ओढवली आहे.
ठाणे महापालिकेने शहरातील ३ हजार ६०० इमारती धोकादायक महणून जाहीर केल्या असून यामध्ये ८९ अतिधोकादायक इमारतींवर लवकरच हातोडा पडणार आहे. शहरात काही ठिकाणी नजरचुकीने तर काही ठिकाणी विकासकांच्या फायद्यासाठी त्या धोकादायक ठरवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरवर्षी धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात येत असल्याने हजारोंच्या संख्येने रहिवासी बेघर होत असतात.
अशाच दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळील सेवाराम आणि रु चिराम या इमारतींवर धोकादायक म्हणून १९९५ साली तत्कालीन पालिका आयुक्त जे.पी. डांगे यांनी कारवाई केली होती. या कारवाईत इमारतींमधील ७६ भाडेकरू बेघर झाले. त्या वेळी पुनर्वसन करण्याचे तोंडी आश्वासन देऊन त्यांना ही घरे खाली करायला लावली, अशी माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख विलास ढमाले यांनी दिली. मागील अनेक वर्षे पाठपुरावा करूनही या ७६ भाडेकरूंचे पुनर्वसन झालेले नाही.