डोंबिवलीतील इंदिरानगरमधील स्वच्छतागृहांचे तीनतेरा; प्रचंड घाण, दुर्गंधी, उंदीर-घुशींचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 01:02 AM2019-12-14T01:02:45+5:302019-12-14T01:05:44+5:30

शौचालयांच्या दुरवस्थेबाबत दाद मागायची तरी कोणाकडे? असा सवाल नागरिकांनी करत फक्त निवडणुका आल्या की तेवढ्या पुरती हालचाल होते

Residents accuse municipal corporation of neglecting repairs | डोंबिवलीतील इंदिरानगरमधील स्वच्छतागृहांचे तीनतेरा; प्रचंड घाण, दुर्गंधी, उंदीर-घुशींचा वावर

डोंबिवलीतील इंदिरानगरमधील स्वच्छतागृहांचे तीनतेरा; प्रचंड घाण, दुर्गंधी, उंदीर-घुशींचा वावर

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : केडीएमसीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत मानांकन मिळवण्यासाठी कंबर कसली असली तरीही प्रत्यक्षात मात्र कार्यवाही कागदोपत्रीच आहे. पूर्वेतील इंदिरानगरमधील शौचालयांची कमालीची दुरवस्था झाली आहे. अस्वच्छता, तुटलेल्या लाद्या, तुटलेले दरवाजे व संडासाची भांडी, झाडे उगवल्याने तडे गेलेल्या भिंती, मुताऱ्यांमध्ये घाणीचे थर, उग्र दर्प, अशा भयंकर अवस्थेत उघड्यावरच शौचाला बसावे लागत आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाला या गंभीर स्थितीकडे बघायला सवड नसल्यानेच ही अवस्था झाली आहे. गोरगरिबांच्या आरोग्याचे कोणी वाली नाही का? असा सवाल परिसरातील रहिवाशांनी केला.

शौचालयांच्या दुरवस्थेबाबत दाद मागायची तरी कोणाकडे? असा सवाल नागरिकांनी करत फक्त निवडणुका आल्या की तेवढ्या पुरती हालचाल होते, मात्र अवघ्या काही दिवसांत स्थिती जैसे थे होते, पुढे काहीही होत नाही, अशी शब्दांत नाराजी व्यक्त केली. महापालिकेचे सफाई कर्मचारीही स्वच्छतेसाठी येत नाही. भयंकर दुर्गंधी, कचºयाचे प्रमाण, डास, उंदीर, घुशी यांचा नेहमीच वावर येथे असतो. तसेच छोट्या गटारांमधून सांडपाणी वाहत असते. त्यामुळे येथील वस्त्यांमध्ये साथींचे आजार, तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात, असे रहिवाशांनी सांगितले.

स्वच्छता निरीक्षक म्हणजे कोण रे भाऊ? असा सवाल येथील महिलांनी केला. महापौर, आयुक्त, उपायुक्त असे बडे अधिकारी कधी बघितलेच नाहीत, असेही त्यांनी सांगितले. साधी डीडीटी पावडरही कधी मारली जात नाही. डासांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी धूर फवारणीही कधी होत नाही. पावसाळ्यात तर स्वच्छतागृहांची अवस्था अधिकच दयनीय असते.

एकीकडून पावसाच्या धारा, गळकी छप्पर, त्यातच घुशींचा वावर, अशातच नैसर्गिक विधी उरकावे लागतात. रात्रीच्या वेळी दिव्यांची सुविधा नसल्याने मेणबत्ती, टॉर्च घेऊन जावे लागते. दिवसा जायचे तर दरवाजे नसल्याने महिला, युवती, युवकांची कुचंबणा होते. कोणीही परपुरुष एकदम स्वच्छतागृहाकडे जाऊन गैरसोय होऊ नये, यासाठी काही महिला बाहेर उभ्या राहतात. एवढे प्रचंड दडपण असल्याने स्वच्छतागृहे असून, नसल्यासारखीच आहे. ही अवस्था कधी सुधारणारच नाही, असे सांगत आता रहिवाशांनी महापालिकेकडून फारसे काही चांगले होईल, अशी अपेक्षा करणेही सोडून दिल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.

मी चार महिन्यांपूर्वी या विभागाचा पदभार घेतला आहे. मी स्वत: सर्वत्र भेट देऊन अभ्यास केला असून, त्याद्वारे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत राज्य सरकारकडून येणारा १० कोटींच्या निधीसाठीचा पाठपुरावा जिल्हाधिकाऱ्यांकडे २५ दिवसांपूर्वी केला आहे. तो निधी आल्यानंतर महापालिका क्षेत्रातील बहुतांशी सर्वच वस्त्यांमधील काही स्वच्छतागृहे तोडून नव्याने बांधण्यात येतील. त्यात इंदिरानगर वसाहतीमधील दोन स्वच्छतागृहे आहेत. तसेच तेथील अन्य दोन व अन्य ठिकाणच्या स्वच्छतागृहांची डागडुजी करण्यासाठी निविदा महापालिका स्तरावर मंजूर झाले आहे. परंतु, आयुक्त गोविंद बोडके बाहेरगावी असल्याने त्या निधीसाठी वित्तीय मान्यता मिळण्याचे काम रखडलेले आहे.
- बाळासाहेब जाधव, कार्यकारी अभियंता, मलनिस्सारण व जलनिस्सारण

इंदिरानगर प्रभागात चार स्वच्छतागृहे आहेत. मात्र, सर्वच स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. अपवाद वगळता कोणीही महापालिकेचा अधिकारी येथे कधीही फिरकत नाही. कसले स्वच्छता सर्वेक्षण आणि कसले काय? तळागळातील नागरिकांकडे बघायला कोणालाही वेळ नाही, ही शोकांतिका आहे. शौैचालयांची अवस्था बिकट आहे. महिलांची तर प्रचंड गैरसोय होते. महापौरांना पत्र दिले आहे. अनेकदा अधिकारी करतो, बघतो, पाहतो अशीच उत्तरे देतात.
- प्रविण पवार, शिवसेना शाखा अध्यक्ष इंदिरानगर

डोंबिवलीमधील सर्वच वस्त्यांमधील स्वच्छतागृहांची अवस्था गंभीर आहे. महापालिकेने नुकतेच स्वच्छतागृहांसंदर्भात ‘ए’ ग्रेडचे प्रमाणपात्र मिळवले. त्यामुळे त्यासंदर्भात स्वच्छता सर्वेक्षणाचे याचे निकष काय आहेत, याचीही माहिती घ्यावी लागेल. पुरस्कार मिळाला तरी आनंद आहे, पण आता तरी दयनीय स्थितीतील स्वच्छतागृह सुधारा. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुल यांची अबाळ होते बघवत नाही. - किशोर मगरे, शहर कार्याध्यक्ष, रिपाइं (आठवले गट)

Web Title: Residents accuse municipal corporation of neglecting repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.