थीम पार्कच्या चौकशी समितीचा अहवाल महिना उलटत आला असतांनाही कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 15:47 IST2018-10-19T15:45:48+5:302018-10-19T15:47:01+5:30
थीम पार्कबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. परंतु त्या समितीची महिना उलटत आला तरीसुध्दा एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे दोषींवर पांघरुन घालण्याचे काम होत आहे का? अशी शंका मात्र या निमित्ताने उपस्थित झाली आहे.

थीम पार्कच्या चौकशी समितीचा अहवाल महिना उलटत आला असतांनाही कागदावरच
ठाणे - घोडबंदर भागातील थीम पार्कमधील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन सध्या शिवसेना आणि भाजपाची नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या झडी सोडत आहेत. परंतु या संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचे पुढे काय झाले याचे कोडे अद्यापही सुटु शकलेले नाही. समिती गठीत करण्यात आली असली तरी त्यात कोण कोण सहभागी आहेत, याबाबत आजही काहीसा संभ्रम आहे. असे असले तरी प्रकरणाला जवळ जवळ महिना उलटून गेल्यानंतरही या समितीची एकही बैठक झाली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा महासभेत या बाबतचा जाब विचारला जाणार आहे.
मागील महिन्यात झालेल्या महासभेत थीम पार्कच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीही नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दोन दिवसात ही समिती नेमली जाणे अपेक्षित असतांना त्यासाठी १५ दिवसांचा कालावधी गेला. त्यानंतर काहींनी या समितीत स्थान देण्यात आले तर काहींना यातून डावलण्यात आले. त्यामुळे समितीत नेमकी कोणती मंडळी आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. असे असतांना जेजे इन्स्ट्युकडून येणारा अहवालसुध्दा अद्याप पालिकेला प्राप्त झालेला नाही. चार दिवसापूर्वी अहवाल येणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी सुध्दा वेळ वाढवून घेतला आहे.
मधल्या काळात भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी या थीमपार्कचा दौरा करुन शिवसेनेवर टिकेची झोड उठविली. लागलीच सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीसुध्दा भाजपावर पलटवार केला. तर आमदार प्रताप सरनाईक यांनीसुध्दा या थीम पार्कचा दौरा करुन पालिका प्रशासनाची पाठराखण करीत ठेकेदावर कारवाईची मागणी केली. तसेच भाजपालासुध्दा आव्हान दिले. शिवसेना आणि भाजपाकडून झालेल्या या आरोप प्रत्यारोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली असून केवळ चौकशी समितीचा फेरा लांबविण्यासाठीच तर या प्रकरणाला वेगळे दिले जात नाही ना? असा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे. एकूणच आता शनिवारी होणाऱ्या महासभेत यावर लोकप्रतिनिधी काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.