प्रदूषणाला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे नोंदवा

By Admin | Updated: July 12, 2016 02:39 IST2016-07-12T02:39:45+5:302016-07-12T02:39:45+5:30

प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी खोल खाडीत सोडण्यासाठी साधी पाईपलाईन टाकलेली नसल्याने अधिकारी कसे निष्काळजीपणाने काम करतात

Report crimes against those responsible for pollution | प्रदूषणाला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे नोंदवा

प्रदूषणाला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे नोंदवा

डोंबिवली : प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी खोल खाडीत सोडण्यासाठी साधी पाईपलाईन टाकलेली नसल्याने अधिकारी कसे निष्काळजीपणाने काम करतात त्याचे उघड दर्शन होताच संतापलेले पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रदूषणाला जबाबदार असलेले अधिकारी, कारखानदारांसह सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण सचिवांना दिले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
डोंबिवली ते अंबरनाथ पट्ट्यातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्याने कोणलाही कल्पना न देता कदम यांनी अचानक डोंबिवली परिसरातील कारखान्यांना भेट दिली. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचे नमुने गोळा केले.
प्रदूषण रोखण्यात केलेल्या ढिलाईबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांची झाडाझडती सुरू केली. प्रदूषण रोखण्यात सुधारणा झाली आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी दर दोन महिन्यांनी या भागाला भेट देणार असल्याचेही त्यांनी बजावले.
प्रदूषण रोखण्यात आणि सांडपाण्यावर प्रक्रि़या करण्यात अपयशी ठरल्याने डोंबिवली आणि अंबरनाथमधील १४२ कारखाने बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट महत्त्वाची मानली जाते.
रायायनिक कारखान्यातील प्रदूषित सांडपाण्यावर योग्य निकषांच्या आधारे प्रक्रिया केली जात नसल्याने त्यांनी डोंबिवलीतील दोन सांडपाणी केंद्रे आणि अंबरनाथमधील सांडपाणी केंद्राला भेट दिली. दोन्ही सांडपाणी केंद्रातून प्रक्रिया केलेल्या पाण्याचे नमुने त्यांनी गोळा केले. प्रक्रिया केल्यावरही इतके काळे पाणी कसे बाहेर पडते, याचा जाब कारखानदारांना विचारला. पावसाळ््यात अशी स्थिती असेल तर इतर दिवसात त्याचे किती भयावह दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. प्रदूषणाबाबत एकंदरीतच अस्वस्थ करणारी स्थिती समोर आल्याने निकषानुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्र न चालविणाऱ्या चालकांविरोधात गुन्हा दाखल करा; तसेच प्रदूषण रोखण्यास असमर्थ ठरलेल्या प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांविरोेधातही गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. एमआयडीसीचे अधिकारीही प्रदूषणाला तितकेच जबाबदार आहेत. त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येईल, असा इशारा कदम यांनी दिला.
अंबरनाथमधील सांडपाणी प्रक्रिया आॅपरेटर आणि बेजबाबदार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश त्यांनी दिले. अंबरनाथच्या उदंचन केंद्राला कंत्राटदाराने टोकलेले टाळे तोडण्याचे आदेश त्यांनी दिले.

१४२ कारखाने अखेर पडले बंद
डोंबिवली : प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावरून कारखाने बंद करण्याच्या नोटिशीला स्थगिती देण्यास हरीत लवादाने नकार दिल्याने डोंबिवली-अंबरनाथमधील १४२ कारखाने बंद झाले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जुलैला होणार असून तोवर हे कारखाने बंद राहतील. तोवर त्यातील सर्व कामगार बेरोजगार झाले असून उत्पादन ठप्प झाल्याने १०० कोटींहून अधिक नुकसान होईल, असा दावा कारखानदारांनी केला आहे.
कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर निकषानुसार प्रक्रिया केली जात नसल्याने डोंबिवलीतील ८६ व अंबरनाथमधील ५६ कारखाने बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली हेती. त्याला ‘कामा’ व ‘आमा’ या कारखानदारांच्या संघटनांनी लवादापुढे आव्हान दिले होते आणि नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र लवादाने स्थगितीला नकार दिल्याने सर्व कारखाने बंद झाले आहेत. या प्रकरणाची सुनावणी २९ जुलैला होणार असल्याने तोवर कारखानदारांचे १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान होईल, असा दावा कारखानदार संघटनांनी केला आहे.
या संदर्भातील मूळ याचिका तीन वर्षांपूर्वी ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने केली होती. त्या दरम्यान लवादाने प्रदूषण मंडळाच्या सुस्त कारभारावर वारंवार ताशेरे ओढले होते. इतकेच नव्हे, तर कारवाई न करणारे मंडळच बंद करावे, असे सुनावले आहे. मंडलाचीच मान लवादाच्या आदेशाच्या कचाट्यात सापडल्याने त्यांनी २ जुलैला डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ कारखान्यांना बंदची नोटीस बजावली आणि ७२ तासात ते बंद करा, असे नमूद केले होते. त्याला कारखानदारांनी हरीत लवादापुढे आव्हान दिले होते. त्याची सुनावणी सोमवारी झाली.

Web Title: Report crimes against those responsible for pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.