टाकाऊतून साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:39 IST2021-03-10T04:39:22+5:302021-03-10T04:39:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: अयोध्येत राम जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य - दिव्य मंदिर उभे राहात असून, ते आगामी काही वर्षांत ...

A replica of the Shriram Temple in Ayodhya, made from waste | टाकाऊतून साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती

टाकाऊतून साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: अयोध्येत राम जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य - दिव्य मंदिर उभे राहात असून, ते आगामी काही वर्षांत पूर्णत्त्वास जाईल. मात्र, त्याआधीच डोंबिवलीतील अशोक बरवे यांनी त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. त्यांनी हे काम त्यांच्यावर झालेल्या एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर जो चार महिन्यांचा काळ सक्तीची विश्रांती म्हणून घरात बसून घालवला, त्या काळात केले आहे.

कोणताही विशेष खर्च न करता टाकाऊतून टिकाऊ यातून त्यांनी एक ते सव्वाफूट उंचीची प्रतिकृती तयार केली आहे. २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या उखळीच्या सांध्याची पुन: एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ४ महिने त्यांना बेडरेस्ट सांगितली होती. या काळात त्यांनी भरपूर वाचन केलेच, पण मोबाईलवर चित्रपट, व्याख्याने, वेबसिरीजही पाहिल्या. मात्र, नंतर त्याचाही कंटाळा आला. सुमारे तीन महिन्यानंतर ते बसायला लागले. तेव्हा काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्याचवेळी अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिराची चित्रे, दृकश्राव्य ध्वनिचित्रफिती आणि अन्य काही लेखन त्यांच्या पाहण्यात, वाचनात आले. त्यातूनच त्यांनी श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचा चंग बांधला. नियोजित मंदिर, त्याविषयीची चित्र, दृकश्राव्य ध्वनिचित्रफिती पाहून, त्यावर चिंतन करून मंदिराचा आराखडा आधी कागदावर तयार केला. त्यानंतर रद्दी व वह्यांमधील पाने घेऊन त्याच्या घट्ट सुरनळ्या तयार करून मंदिराचे खांब तयार केले. तयार शर्ट, मिठाईचे खोके यापासून बाकीची बांधणी केली. हे सर्व पूर्ण झाल्यावर ॲक्रॅलिक रंगाने संपूर्ण मंदिर रंगविले. आणखी काहीतरी वेगळे करावे, या हेतूने त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे जुन्या इमिटेशन ज्वेलरीमधील मणी त्यावर चिकटवून त्याला आणखी आकर्षक रूप दिले. श्रीरामाच्या प्रेरणेने आणि आशीर्वादानेच हे कार्य हातून घडले, असे त्यांनी सांगितले. आता नवी दिल्ली येथील ''अक्षरधाम''ची प्रतिकृती तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

------

Web Title: A replica of the Shriram Temple in Ayodhya, made from waste