‘एनआरसी’ कंपनीत पुन्हा टाकला कचरा
By Admin | Updated: March 24, 2017 01:03 IST2017-03-24T01:03:51+5:302017-03-24T01:03:51+5:30
मालमत्ताकरापोटी ५५ कोटी रुपये थकवल्याप्रकरणी एनआरसी कंपनीच्या आवारात मंगळवारी कचरा टाकण्यात आला होता.

‘एनआरसी’ कंपनीत पुन्हा टाकला कचरा
कल्याण : मालमत्ताकरापोटी ५५ कोटी रुपये थकवल्याप्रकरणी एनआरसी कंपनीच्या आवारात मंगळवारी कचरा टाकण्यात आला होता. अशी कारवाई गुरुवारीही करण्यात आली. शहाड येथील मराठे बिल्डर्स यांची मोकळ्या जमिनीवरील मालमत्ताकराची १० लाखांची थकबाकी असल्याने त्यांच्या खुल्या जमिनीवर कचरा टाकण्यात आला. याव्यतिरिक्त एनआरसीच्या जागेतही गुुरुवारी पुन्हा चार मोठ्या गाड्यांद्वारे कचरा टाकण्यात आला. कचरा टाकल्यानंतर महापालिकेकडून तेथे जंतुनाशके व दुर्गंधीनाशक औषधफवारणी केली जात आहे. दरम्यान, आंबिवली येथील नेपच्यून बिल्डर्सचे सेल्स आॅफिस ६ कोटींच्या थकबाकीप्रकरणी सील करण्यात आले.
केडीएमसी प्रशासनाच्या कचरा टाक ण्याच्या कारवाईबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही गुरुवारी एनआरसी कंपनी, मराठे बिल्डर्सच्या जागेच्या आवारात कचरा टाकण्यात आला. ही कारवाई ‘अ’ प्रभागाचे अधिकारी सुनील पाटील यांच्या पथकाने केली. ‘जे’ प्रभागाचे अधिकारी प्रकाश ढोले यांनी साडेसहा लाखांच्या थकबाकीपोटी माजी महापौर कल्याणी पाटील यांचे पती नितीन पाटील यांचा ढाबाही सील केला आहे. तर, ‘ब’ प्रभागात केलेल्या कारवाईत प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांच्या पथकाने पाणीबिलाच्या ४ लाखांच्या थकबाकीप्रकरणी रामबागमधील कडू निवास येथील पाणीजोडणी खंडित केली. १ कोटी ५ लाखांच्या थकबाकीप्रकरणी १७ सदनिका सील केल्या असून ७७ लाख ५१ हजार थकबाकीप्रकरणी व्टेंटीफर्स्ट सेंच्युरी इन्फ्रा लि. यांच्यासह ८६ लाख ३१ हजारांच्या थकबाकीमुळे ह्युम नेटवर्क या मोबाइल टॉवरला जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ही कारवाई टाळण्याकरिता थकबाकीदारांनी तातडीने थकीत रकमा महापालिका फंडात भराव्यात, असे आवाहन पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी केले आहे.
दरम्यान, आतापर्यंत केलेल्या करवसुलीतून २७४ कोटी ७९ लाखांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (प्रतिनिधी)