मुख्यालयासह गडकरी रंगायतनचीही डागडुजी

By Admin | Updated: October 12, 2016 04:30 IST2016-10-12T04:30:04+5:302016-10-12T04:30:04+5:30

एकीकडे ठाणे महापालिकेने २५ वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या सूचना इमारतधारकांना दिल्या असतांना ठामपाने

Repair of Gadkari Rangiyatani with Headquarters | मुख्यालयासह गडकरी रंगायतनचीही डागडुजी

मुख्यालयासह गडकरी रंगायतनचीही डागडुजी

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेने २५ वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या सूचना इमारतधारकांना दिल्या असतांना ठामपाने देखील त्यांच्या मालकीच्या जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यानुसार महापालिकेचे मुख्यालय आणि गडकरी रंगायतन या दोन्ही इमारतींची दुरुस्ती होणार आहे. मुख्यालयासाठी ५ कोटी ९२ लाख आणि गडकरी रंगायतनसाठी २ कोटी ६५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे रंगायतनवर सॅटीससारखे छत आच्छादले जाणार आहे.
ठामपाने गेल्यावर्षीपासून शहरातील धोकादायक इमारतींचा नव्याने सर्व्हे करुन शासनाच्या निकषानुसार त्यांची ए, बी, सी अशी वर्गवारी केली आहे. ती केल्यानंतर ए वर्गात येणाऱ्या इमारती तत्काळ खाली करुन त्या पाडल्या जात आहेत. तसेच ज्या इमारतींची दुरुस्ती होऊ शकते अशा इमारती बी वर्गात घेतल्या आहेत. या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे क्रमप्राप्त केले आहे. परंतु, त्याला ठाणेकरांचा अद्यापही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पालिकेने आपल्या आस्थापनांच्या इमारतींचेदेखील स्ट्रक्चरल आॅडिट करुन ठाणेकरांपुढे एक आदर्श ठेवण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
त्यानुसार महापालिका मुख्यालय आणि गडकरी रंगायतनतचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन घेतले असून यामध्ये मुख्यालय आणि गडकरी रंगायतन पास झाले असून त्या दोघांचीही आता डागडुजी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत ठेवला आहे.
ठाणे येथील पाचपखाडी भागात महापालिका मुख्यालयाची इमारत आहे. विविध कामांसाठी नागरिकांना सातत्याने मुख्यालयात यावे लागू नये म्हणून मुख्यालयाचे विकेंद्रीकरण करून प्रभाग समित्यांची निर्मिती केली. त्याचा फायदा महापालिका क्षेत्रातील नागरिकांना होत आहे. असे असले तरी प्रभाग समित्यांचा संपूर्ण कारभार मुख्यालय इमारतीच्या नियंत्रणाखालीच चालविण्यात येतो. त्यामुळे प्रभाग समित्या जरी असल्या तरी मुख्यालयाकडे प्रशासकीय केंद्र म्हणून पाहिले जाते. महापालिका मुख्यालय इमारतीचे बांधकाम १९८९ मध्ये केले असून त्यास आता २७ वर्षे झाली आहेत. स्ट्रक्टरल आॅडिटनुसार या इमारतीचे बांधकाम सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. तरीही इमारतीतील काही दुरुस्तीची कामे अहवालात सुचिवली आहेत. त्यानुसार प्रशासनाने इमारत दुरूस्ती कामांचा सविस्तर प्रस्ताव तयार केला असून त्यामध्ये छतावरील गळती, दुरु स्ती आणि रंगरंगोटीचे काम होणार आहे.

Web Title: Repair of Gadkari Rangiyatani with Headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.