वालधुनी नदीपुलावरील खड्ड्यांची केली दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:47 IST2020-10-10T00:47:41+5:302020-10-10T00:47:44+5:30
भविष्याच्या दृष्टीने पुनर्बांधणी गरजेची

वालधुनी नदीपुलावरील खड्ड्यांची केली दुरुस्ती
उल्हासनगर : रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक वालधुनी नदीच्या पुलाची दखल पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी घेत पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. बुधवारी व गुरुवारी पुलावरील खड्डे भरण्यात आले. मात्र, भविष्याच्या दृष्टीने पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी कायम असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक टोनी सिरवानी व गजानन शेळके यांनी दिली. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’च्या ७ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे.
उल्हासनगर रेल्वेस्टेशनकडे जाणाºया संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील सिमेंट पाइपपूल ५० वर्षे जुना आहे. कमी उंचीचा असलेल्या पुलावरून नदीच्या पुराचे पाणी जात असल्याने पुलावर मोठा खड्डा पडला आहे. धोकादायक झालेल्या पुलामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातूनच पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी सिरवानी, शेळके यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्यावर अंदाजपत्रकात विशेष निधीची तरतूद केली. यावर्षीही निधीची तरतूद केली होती. मात्र, पुलाचे काम काही सुरू झाले नाही, असे सिरवानी यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर आयुक्तांनी त्याची दखल घेतली. आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवारी, गुरुवारी खड्डे भरण्यात आले. स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने, नागरिक व रिक्षाचालकांकडून पुनर्बांधणीची मागणी होत आहे. कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांनी पुलाची लवकरच पुनर्बांधणी केली जाईल, असे सांगितले.