विल्हेवाट लावा, अन्यथा कचरा उचलणार नाही
By Admin | Updated: July 7, 2016 02:36 IST2016-07-07T02:36:55+5:302016-07-07T02:36:55+5:30
शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ढोकाळी येथील प्राइड प्रेसिडन्सी लक्झोरिया या सोसायटीने कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला

विल्हेवाट लावा, अन्यथा कचरा उचलणार नाही
ठाणे : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ढोकाळी येथील प्राइड प्रेसिडन्सी लक्झोरिया या सोसायटीने कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी सोसायटीतील महिला रहिवाशांनी पुढाकार घेतला असून १५ दिवसांनंतर कचऱ्याचे वर्गीकरण ज्या घरात होणार नाही, त्यांचा कचरा न उचलण्याचा निर्धार सोसायटीने केला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या प्राइड प्रेसिडन्सी लक्झोरियाने पाणीबचतीनंतर कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. सोसायटीमध्ये दरमहिन्याला १६ ते १८ टन कचरा निर्माण होतो. परंतु, आतापर्यंत तो कचरा वेगळा केला जात नव्हता. वेगळा केल्यास हाउसकिपिंगवर येणारा ताणही कमी होईल आणि ओल्या कचऱ्यापासून खत तयार करून त्याचा वापर सोसायटीतील झाडांसाठी करण्यात येईल, या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात आहे. सोसायटीच्या रहिवासी पल्लवी रॉय यांना ही संकल्पना प्रथम सुचली आणि प्रीती कश्यप, विनिता मेनन, पद्मजा नायर, शीला के यांनी ही संकल्पना उचलून धरली. त्यानंतर, या टीमने घरोघरी जाऊन कचरा व्यवस्थापनाचे धडे देण्यास सुरुवात केली. शनिवारी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी या विषयातील तज्ज्ञ सीमा रेडकर उपस्थित होत्या. त्यांनी ओला व सुका कचरा कसा ओळखायचा, त्याचे वर्गीकरण कसे करायचे, खतनिर्मिती कशी करायची, अशा विविध बाबींवर मार्गदर्शन केले. या प्रकल्पाची पहिली पायरी म्हणून सोसायटीने निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचे ठरवले आहे. त्यानंतर, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. तसेच, मुलांमध्येही याबाबत जागृती व्हावी, यासाठी त्यांच्या सहभागाने ई-कचरा वेगळा केला जाणार आहे. प्रत्येक घरात ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळे कचऱ्याचे डबे ठेवण्यास सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकल्पास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सर्व रहिवाशांना वेळ दिला जाणार आहे. मात्र, काही कालावधीनंतर ज्या रहिवाशांकडून हे वर्गीकरण केले जाणार नाही, त्यांचा कचरा न उचलण्याचे आदेश हाउसकिपिंगला देणार असल्याचे प्रीती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विद्या धारप पवित्र पुरस्काराने सन्मानित
डोंबिवली : कल्याणमधील परिवाराच्या ‘वस्ती सेवा कार्य’ विभागातील समाजसेविका विद्या धारप यांना पवित्र पुरस्काराने गौरवण्यात आले. संघाचे अखिल भारतीय सहसेवाप्रमुख अजित महापात्रा यांच्या हस्ते ‘यशवंत भुवन’मध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाल्यानंतर धारप यांनी अण्णाभाऊसाठेनगर या कचरावेचकांच्या वस्तीत कचरावेचकांच्या व गरीब विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे काम सुरू केले. मुलामुलींना शिकवणे, त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, त्यांच्या अडीअडचणी, आजारपणात त्यांना मदत करणे, स्वच्छता, मुलांसाठी मुंबईची सफर आदी उपक्रम त्यांनी राबवले. एक टीम म्हणून सामाजिक सेवाकार्य त्या पुढे नेत आहेत. पुरस्काराची रक्कम समाजकार्यासाठीच त्या वापरणार आहेत. धारप यांचे पती विश्वास यांचेही समाजकार्य मोठे आहे. अनेक वर्षे ते जनकल्याण समितीचे कार्यवाह होते. त्यांच्या प्रयत्यांमुळे फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे नवीन वाहन समितीला मिळाले. दुष्काळातही त्यांनी मोठा निधी जमा केला.