बुलडोझर बाबा पोस्टर काढा; आनंद परांजपे यांची महायुतीमधील नेत्यावर अप्रत्यक्ष टीका
By अजित मांडके | Updated: June 29, 2024 16:03 IST2024-06-29T16:02:38+5:302024-06-29T16:03:08+5:30
शिंदे यांच्या हाती हातोडा दाखविलेले पोस्टर सोशल मिडिया आणि शहरात झळकू लागले आहेत.

बुलडोझर बाबा पोस्टर काढा; आनंद परांजपे यांची महायुतीमधील नेत्यावर अप्रत्यक्ष टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अनाधिकृत पब, हुक्का पार्लर, बारवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील महापालिकेच्या माध्यमातून कारवाई सुरु झाली आहे. या कारवाईच्या अनुषंगाने सध्या महाराष्टÑाचा बुलडोजर बाब म्हणून शिंदे यांच्या हाती हातोडा दाखविलेले पोस्टर सोशल मिडिया आणि शहरात झळकू लागले आहेत. मात्र त्यावर महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आक्षेप घेतला आहे. राज्यात कायद्याच्या अनुषंगाने ही कारवाई सुरु असल्याने कोणीही बुलडोझर बाबा असे पोस्टर लावू नये असे सांगतांनाच महायुतीमधील नेत्यांमध्ये किमान इतकी परिपक्वता असावी असे मतही त्यांनी पोस्टर लावणाºयांविषयी व्यक्त करीत एकप्रकारे अप्रत्यक्षपणे टिकाच केल्याचे दिसत आहे.
पूण्यात एका मागून एक घडलेल्या घटनांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर ठाणे, मिराभार्इंदर ,कल्याण मधील देखील अनाधिकृत बार, पब, हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यानुसार मागील तीन दिवसापासून ठाण्यासह मिराभार्इंदर आणि कल्याणमध्येही कारवाई सुरु झाली आहे. परंतु ही कारवाई सुरु असतांनाच ठाण्यात बुलडोझर बाबा असा आशय असलेले पोस्टर झळकल्याचे दिसून आले. तसेच सोशल मिडियावर देखील याची चर्चा सुरु झाली. हे पोस्टर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लावल्याचे दिसून आले.
दरम्यान राज्यात जशी कारवाई सुरु आहे. तशीच कारवाई यापूर्वी उत्तरप्रदेशातही झाली होती. या कारवाई नंतर मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांचा बुलडोझर बाबा असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आता ठाण्यातही तशाच स्वरुपाचो पोस्टर झळकू या पोस्टरबाजी बाबत राष्टÑवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी वेगळे मत व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशात कोणत्याही नोटिसविनाच कारवाई करण्यात आली होती. राज्यात मात्र कायद्याला धरून कारवाई होत असल्याने कुणीही बुलडोझरबाबा असे पोस्टर लावू नये, असे परांजपे यांनी म्हटले आहे. बुलडोझर बाबा असे पोस्टर लावू नयेत, इतकी परिपक्वता महायुतीच्या नेत्यांमध्ये असावी, असे मत व्यक्त करत त्यांनी पोस्टर लावणाऱ्यांवर एकप्रकारे टीका केली असल्याचेच दिसून आले आहे.
दुसरीकडे महापालिकेकडून जी कारवाई सुरु आहे, त्यात भेदभाव केला जाऊ नये, दिखाव्यापुर्ती कारवाई करु नये असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.