नॉनकोविड रुग्णालयांनाही रेमडेसिविर पुरवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:26+5:302021-04-19T04:37:26+5:30

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक आरटीपीसीआर तपासणी करतात. हा अहवाल येण्यास किमान दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे प्राथमिक ...

Remedacivir should also be provided to noncovid hospitals | नॉनकोविड रुग्णालयांनाही रेमडेसिविर पुरवावेत

नॉनकोविड रुग्णालयांनाही रेमडेसिविर पुरवावेत

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक आरटीपीसीआर तपासणी करतात. हा अहवाल येण्यास किमान दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात. काही वेळेस या रुग्णांनाही रेमडेसिविर इंजेक्शन देणे आवश्यक असते. परंतु खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचारास विलंब होतो. यासाठी ठाण्यातील नॉनकोविड रुग्णालयांतदेखील रेमडेसिविरचा पुरवठा करावा, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे रविवारी केली आहे.

ठाण्यामध्ये महापालिकेच्या कोविड रुग्णालयाव्यतिरिक्त एकूण ४० खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयांची मान्यता दिली आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये केवळ १६ रुग्णालयांचीच नावे समाविष्ट आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने मान्यता दिलेल्या सर्व कोविड रुग्णालयांची नावे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या यादीत समाविष्ट करावीत, तसेच कालानुरूप जसजशी खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून महापालिकेच्या वतीने मान्यता देण्यात येईल, त्या रुग्णालयांची नावेही जिल्हाधिकाऱ्यांनी यादीत समाविष्ट करावी, असे महापौरांनी म्हटले आहे.

संशयित व्यक्तीने तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम अँटिजेन टेस्ट केली जाते. त्याचा अहवाल अवघ्या काही मिनिटांमध्ये मिळतो; परंतु ही टेस्ट निगेटिव्ह आली आणि लक्षणे असली तर आरटीपीसीआर चाचणी केली जाते. मात्र, या चाचण्या करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असून, चाचणी अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांचा अवधी लागतो. या रुग्णाकडे कोविड पॉझिटिव्हचा रिपोर्ट नसल्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले जात नाही; परंतु कोरोनाचीच लक्षणे असल्यामुळे डॉक्टर त्यांना बहुतांश वेळा एचआरसीटी तपासणी करण्यास सांगतात. यामध्ये फुप्फुसामध्ये इन्फेक्शन असेल अशा रुग्णांनाही रेमडेसिविर इंजेक्शनची नितांत आवश्यकता असते. परंतु, खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे योग्य उपचार करण्यास विलंब होतो. यातून रुग्ण नाहक दगावला जाण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर नॉनकोविड रुग्णालयातही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध असणे आवश्यक आहे.

* महापालिकेने मान्यता दिलेल्या कोविड रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाते. सद्य:स्थितीत नॉनकोविड रुग्णालयात या इंजेक्शनची आवश्यकता लक्षात घेऊन, याबाबत योग्य नियोजन करून कोविड रुग्णालयासह नॉनकोविड रुग्णालयातही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे, असेही महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Remedacivir should also be provided to noncovid hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.