शरीरविक्रयातून उल्हासनगरात तिघींची मुक्तता : एकास अटक
By Admin | Updated: August 15, 2015 22:36 IST2015-08-15T22:36:22+5:302015-08-15T22:36:22+5:30
शरीरविक्रयाच्या व्यवसायातून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तीन तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी सुनील ऊर्फ रामउजागीर शर्मा (३१) रा. कल्याण

शरीरविक्रयातून उल्हासनगरात तिघींची मुक्तता : एकास अटक
- जितेंद्र कालेकर, ठाणे
शरीरविक्रयाच्या व्यवसायातून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तीन तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी सुनील ऊर्फ रामउजागीर शर्मा (३१) रा. कल्याण याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरच्या स्वर्गद्वार स्मशानभूमीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सिद्धार्थ कॉलनी येथे १३ आॅगस्ट रोजी रात्री १०.३० वा.च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुनिल हा मसाजचे तंत्रशुद्ध ज्ञान घेतल्यानंतर तो अनेक ठिकाणी मसाजसाठी जात होता. त्याच काळात काही गिऱ्हाइकांनी त्याला अशा प्रकारे त्याने स्त्रिया पुरवाव्यात असे सुचवले. त्यानुसार त्याने परिस्थितीने गरीब असलेल्या मुलींना फूस लावून त्यांना हा व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यानुसार, मागणीप्रमाणे तो दोन, तीन कधी पाच हजार रुपये घेऊन गिऱ्हाइकांना या मुली पुरवित असे.
गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त, सहायक आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक पी.एस. ठाकूर, उपनिरीक्षक शरद पंजे, कल्याणी पाटील, चंद्रकांत घाडगे आदींच्या पथकाने सापळा लावून त्याला जेरबंद केले. त्याने आधी मोटारसायकलवरून आणलेल्या दोन मुली आणि नंतर आलेली एक अशा तिघींची त्याच्या तावडीतून सुटका केली. व्हॉट्सअॅपवर या मुलींचे फोटो पाठवून तो संबंधित गिऱ्हाइकांकडे कारने त्यांना घेऊन जायचा. त्याच्याकडून पाच हजारांची रोकड, दोन हजारांचा मोबाइल आणि ५० हजारांची मोटारसायकल असा ऐवज जप्त केला आहे. हिललाइन पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. सुनील याला ठाणे न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.