शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे २३ जानेवारीला लोकार्पण

By Admin | Updated: December 23, 2016 03:09 IST2016-12-23T03:09:00+5:302016-12-23T03:09:00+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काळातलाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

Release of Shiv Sena's memorial on 23rd January | शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे २३ जानेवारीला लोकार्पण

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे २३ जानेवारीला लोकार्पण

कल्याण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काळातलाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी २३ जानेवारीला या स्मारकाचे लोकार्पण करण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. या स्मारकाच्या ठिकाणी उभारण्यात येणारा बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा कोल्हापूरमध्ये साकारण्यात येत असून ते कामही पूर्णत्वाला आले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कल्याणमध्ये स्मारक उभारावे, असा ठराव केडीएमसीच्या २०१३ च्या महासभेत मंजूर करण्यात आला. तो तत्कालीन सभागृहनेते रवींद्र पाटील यांनी मांडला होता. प्रस्तावित स्मारकासाठी एक कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.
दरम्यान, स्मारक उभारण्यासाठी केडीएमसीने संकल्पचित्रे मागवली होती. त्याला चार संस्थांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी शशी प्रभू अ‍ॅण्ड असोसिएट्स या संस्थेच्या संकल्पचित्राला पसंती देण्यात आली. काळातलाव परिसरातील एक एकर भूखंडावर बाळासाहेबांचे स्मारक उभे राहत आहे. प्रत्यक्षात कामाला २०१४ मध्ये प्रारंभ झाला.
काळातलाव प्रभागाचे नगरसेवक सुधीर बासरे यांचे बंधू व माजी नगरसेवक सचिन बासरे यांच्या देखरेखीखाली त्याचे काम होत आहे. ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. बासरे यांनीही या स्मारकाचे लोकार्पण बाळासाहेबांच्या जयंतीदिनी करण्याचे ठरल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)
२२ फूट उंचीचा पुतळा
बाळासाहेबांचा पुतळा कोल्हापुरात तयार करण्यात येत आहे. त्याचे कामही पूर्ण झाले आहे. शिल्पकार संताजी चौगुले यांनी हा पुतळा साकारला आहे. ४ हजार किलोचा आणि २२ फूट उंच, असा हा भव्य पुतळा आहे. मध्यंतरी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कोल्हापुरात जाऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर, महापौर देवळेकर व महापालिकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही कोल्हापूरचा दौरा केला होता. त्यांच्यासोबत शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, केडीएमसीचे सभागृहनेते राजेश मोरे आणि गटनेते रमेश जाधव उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांचा हा पुतळा कल्याणमधील शिवसैनिकांकरिता औत्सूक्याचा ठरला आहे.
‘अ‍ॅनिमाट्रॉनिक्स’ तंत्राचा वापर
बाळासाहेबांच्या स्मारकात डॉक्युमेंटरीद्वारे त्यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. तेथे गार्डन, आर्ट गॅलरी, अ‍ॅम्फी थिएटर उभारण्यात येत आहे. स्मारकाच्या ठिकाणी विदेशातील ‘अ‍ॅनिमाट्रॉनिक्स’ या अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा प्रत्यक्षात दिसल्याचा भास होईल. शिवसेनाप्रमुखांचा हुबेहूब आवाज ऐकू येऊ शकेल. हे या स्मारकाचे मुख्य आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर पुतळ्याच्या पायथ्याशी एक छोटे जलाशय आणि पाण्याचे कारंजे असेल. उतरत्या जमिनीवर लॅण्डस्केपिंग करण्यात येणार असल्याने हे स्मारक अद्वितीय असे ठरणार आहे. याठिकाणी संयुक्त महाराष्ट्र, भारतमाता, वाघ, शिवाजी महाराजांचे शिल्पही साकारण्यात आले आहे.

Web Title: Release of Shiv Sena's memorial on 23rd January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.