कचरा वर्गीकरणावर दिला भर

By Admin | Updated: May 9, 2017 00:57 IST2017-05-09T00:57:18+5:302017-05-09T00:57:18+5:30

शहर स्वच्छतेत कल्याण-डोंबिवलीचा क्रमांक घसरल्याने महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे.

Refuse to give garbage taxonomy | कचरा वर्गीकरणावर दिला भर

कचरा वर्गीकरणावर दिला भर

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : शहर स्वच्छतेत कल्याण-डोंबिवलीचा क्रमांक घसरल्याने महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी सोमवारी आढावा बैठकीत कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्याचे आदेश दिले. तसेच कचरा गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे, दुपारीही कचरा वाहून नेणे आणि कचऱ्याचे वर्गीकरण प्राधान्याने करण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या. दरम्यान, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याबाबत केडीएमसीचे आरोग्य निरीक्षक व अन्य अधिकारी सोसायट्यांमध्ये मार्गदर्शन करत आहेत.
कचऱ्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. त्यानंतर, शनिवारच्या स्थायीच्या सभेत सर्व पक्षांच्या सदस्यांनी प्रशासनावर तोंडसुख घेतले. कचराप्रश्नी नियोजनपूर्वक अहवाल सादर केला जात नाही, तोपर्यंत सभा चालणार नाही, असा पवित्रा घेत सभापती रमेश म्हात्रे यांनी सभा तहकूब केली.
प्रशासनाच्या सोमवारच्या साप्ताहिक आढावा बैठकीत कचऱ्याचा मुद्दा हाच केंद्रबिंदू होता. महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागावर रोष व्यक्त केल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने शहरातील सोसायट्यांमधून जागृती करण्यास सुरुवात केली आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, ओला कचरा दररोज तर सुका कचरा एक दिवसाआड नेला जाईल, ओला आणि सुका कचरा कोणता, कचरा वर्गीकरणासाठी दोन डबे ठेवा अथवा ओला कचरा एका पिशवीत गोळा करा, अशा सूचना स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य निरीक्षकामार्फत केल्या जात आहेत.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व उपायुक्त धनाजी तोरस्कर, सहायक अधिकारी विलास जोशी हेही ठिकठिकणच्या प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांचे प्रबोधन करत आहेत.

Web Title: Refuse to give garbage taxonomy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.