वाहतूक प्रस्तावाला रेड सिग्नल

By Admin | Updated: December 22, 2016 05:43 IST2016-12-22T05:43:06+5:302016-12-22T05:43:06+5:30

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक तसेच पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सल्लागार

Red signal of traffic proposal | वाहतूक प्रस्तावाला रेड सिग्नल

वाहतूक प्रस्तावाला रेड सिग्नल

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक तसेच पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सल्लागार कंपनीने तयार केलेल्या अहवालाच्या प्रस्तावाला मंगळवारच्या महासभेत स्थगिती देण्यात आली. या प्रस्तावात मोठ्या प्रमाणावर त्रुटी असून परिपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश महासभेने प्रशासनाला दिले.
वाहतूक तसेच पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मे. आकार अभिनव कंपनी प्रा.लि. यांची सर्वेक्षणासह विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नियुक्ती केली आहे. या संस्थेने महापालिका हद्दीतील प्रमुख रेल्वेस्थानके व त्यालगतच्या परिसराचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे. अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन उपाययोजनांसाठी ११ हजार १२६ कोटी ७२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील २० वर्षांच्या कालावधीसाठी या खर्चाचे नियोजन करण्यासाठी संबंधित प्रकल्प अहवालास महासभेची मान्यता मिळण्यासाठी मंगळवारी प्रस्ताव दाखल केला होता. येत्या दोन ते तीन वर्षांत कल्याण-डोंबिवली शहरांत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
यात डोंबिवली शहरातील मानपाडा चाररस्ता, घरडा सर्कल, अक्षय हॉस्पिटल, मानपाडा जंक्शन तर कल्याणमधील दुर्गाडी चौक, सुभाष चौक, भवानी चौक, खडकपाडा चौक, शहाड चौक आदी नऊ ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी दिली. तसेच गजानन चौक, मोहिंदर सिंग शाळेच्या चौकात पादचारी पूल उभारायचा आहे. काही मार्ग एकदिशा करण्याचेही प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संस्थेने चुकीची माहिती पुरवली
प्रस्ताव चर्चेला येताच यात मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याकडे सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी लक्ष वेधले. संस्थेने पुरवलेली माहिती चुकीची आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
२० वर्षांत ११ हजार १२६ कोटी ७२ लाख रुपये खर्च होणार आहेत. म्हणजे वर्षाला साडेपाचशे कोटी रुपये खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. हा खर्च महापालिकेला परवडणारा आहे का, असा सवाल नगरसेवक श्रेयस समेळ यांनी केला.
केंद्र आणि राज्य सरकारकडून यासाठी निधी येणार आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. रस्त्यात अडथळा ठरणारे ट्रान्सफॉर्मर, टपऱ्या हटवा वाहतूक सुरळीत होईल, अशी सूचना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली.

Web Title: Red signal of traffic proposal