मरगळ झटकण्यासाठी नेते कामाला, रवींद्र चव्हाणांचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:58 IST2021-02-14T00:56:42+5:302021-02-14T00:58:57+5:30

Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असतानाही पक्षातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने पक्षाची महापालिकेतील सत्ता गेली.

Ravindra Chavan's visit to inaugurate six offices in Ulhasnagar | मरगळ झटकण्यासाठी नेते कामाला, रवींद्र चव्हाणांचा दौरा

मरगळ झटकण्यासाठी नेते कामाला, रवींद्र चव्हाणांचा दौरा

उल्हासनगर : महापालिकेत बहुमतात असतानाही विरोधी बाकांवर बसावे लागत असल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. ती झटकण्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी सहा जनसंपर्क कार्यालयांचे उद्‌घाटन करून कामाला लागण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असतानाही पक्षातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने पक्षाची महापालिकेतील सत्ता गेली. सत्ता गेल्याचे खापर आमदार कुमार आयलानी यांच्यावर फोडण्यात येते. महापालिकेतील सत्ता गेल्यावर पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांत पुन्हा बळ आणण्यासाठी चव्हाण उल्हासनगरमध्ये आले होते. त्यांच्या हस्ते गोल मैदानातील गार्डनच्या सुशोभीकरणाचे उद्‌घाटन 
झाले. 
पक्षाला उभारी देण्यासाठी संपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका वठवतील, असे त्यांनी सांगितले, तसेच बंडखोरी केलेल्या ओमी टीम समर्थक नगरसेवकांवर कारवाई करावी की नाही, हा पक्षांतर्गत भाग असल्याचे ते म्हणाले. 
शहरात भाजप व ओमी कलानी टीम यांची युती कायम असून, यापुढेही कायम राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.

ओमी कलानी यांचे मौन
भाजपने ओमी कलानी टीमसोबत युती करून महापालिकेवर सत्ता मिळवली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी देण्याचा शब्द पाळला नसल्याचा आरोप करत ओमी यांनी महापौरपदाच्या दुसऱ्या टर्म निवडणुकीत भाजपऐवजी शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे बहुमत असताना भाजपची सत्ता पालिकेतून गेली. रवींद्र चव्हाण यांनी ओमी टीमसोबत युती असल्याची कबुली दिली. मात्र, ओमी यांनी मौन पाळले आहे.
 

Web Title: Ravindra Chavan's visit to inaugurate six offices in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.