वीजपुरवठा खंडित करण्याची रागपट्टी
By Admin | Updated: March 26, 2017 04:43 IST2017-03-26T04:43:44+5:302017-03-26T04:43:44+5:30
एक लाखापेक्षा जास्त रकमेची मालमत्ताकराची थकबाकी असलेल्यांची वीज कापण्याची राणाभीमदेवी थाटाची घोषणा

वीजपुरवठा खंडित करण्याची रागपट्टी
ठाणे : एक लाखापेक्षा जास्त रकमेची मालमत्ताकराची थकबाकी असलेल्यांची वीज कापण्याची राणाभीमदेवी थाटाची घोषणा ठामपा प्रशासनाने केली असली, तरी ‘महावितरण’च्या नियमानुसार अशी वीज कापता येणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या विनंतीची अंमलबजावणी करणे अशक्य असल्याचे ‘महावितरण’च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्वत:च्या करांची थकबाकी वसूल करण्याकरिता महापालिका अशी रागपट्टी का देत आहे, असा सवाल केला जात आहे.
कचराकराची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने थेट व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर मांसमच्छीचा कचरा टाकण्याचा अविचार केला, तर मालमत्ताकराची थकबाकी असलेल्यांची वीज कापण्याचा बेकायदा इशारा दिला. करवसुलीकरिता लोकांचा विश्वास संपादन न करता असे बिनबुडाचे उपाय योजण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिका प्रशासन का करीत आहे, असा सवाल याबाबत केला जात आहे.
मार्चअखेरपर्यंत विविध करांची वसुली करण्यात दिरंगाई करणारे प्रशासन आता आर्थिक वर्षाच्या शेवटच्या पंधरवड्यात जागे झाले असून थकबाकी वसुलीकरिता असे अघोरी उपाय योजले जात आहेत. कचराकराची थकबाकी असलेल्या व्यापाऱ्यांना इंगा दाखवण्याकरिता पालिकेने त्यांच्या दुकानांबाहेर कचरा टाकण्याचा प्रताप केला. हे पाऊल उचलल्याने कचराकराची वसुली झाली नाही. उलट, नियमबाह्यवर्तन केल्याने प्रशासन ठाणेकरांच्या नजरेतून उतरले. प्रशासन व व्यापारी यांच्या संबंधात वितुष्ट आले. त्यानंतर, आता मालमत्ताकराची वसुली करण्यासाठी पालिकेने कठोर, पण कायदेशीर पावले उचलणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता मालमत्ताकराची थकबाकी असलेल्यांंचा वीजपुरवठाा खंडित करण्याचा इशारा दिला. याबाबतचे पत्र महापालिकेने ‘महावितरण’ला दिले असून पहिल्या टप्प्यात १ लाखाच्यावर थकबाकी असलेल्यांची वीज कापली जाईल, असे जाहीर केले. एवढी मोठी थकबाकी असलेल्यांची संख्या ९०० च्या वर असून त्यांच्याकडून ४० कोटींच्या आसपास वसुली अपेक्षित आहे.
यासंदर्भात ‘महावितरण’शी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महापालिकेचे पत्र मिळाले आहे. मात्र, विजेची थकबाकी नसलेल्यांची वीज मालमत्ताकराच्या वसुलीसाठी कापता येणार नाही. असे करणे नियमबाह्य आहे.
आमच्या थकबाकीदारांच्या वसुलीचे उद्दिष्ट मार्चअखेरपर्यंत पूर्ण करायचे असल्याने कर्मचारी त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे पालिकेला आम्ही मदत कशी करणार, हा पेच आहे. (प्रतिनिधी)
भोळसट समजुतीत प्रशासन
थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे ठामपा प्रशासन अक्षरश: तोंडावर आपटले आहे. थकबाकीदारांना अशी रागपट्टी दिल्याने त्यांची घाबरगुंडी उडून ते कर भरतील, अशा भोळसट समजुतीत प्रशासन असल्याची चर्चा सुरू आहे.