बाप्पांच्या स्वागताला रस्त्यांतील खड्ड्यांची ‘रांगोळी’
By Admin | Updated: September 3, 2016 02:41 IST2016-09-03T02:41:51+5:302016-09-03T02:41:51+5:30
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला असतानाही ठाणे जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. काही पालिकांनी खड्ड्यांत तात्पुरती खडी भरण्यास सुरूवात

बाप्पांच्या स्वागताला रस्त्यांतील खड्ड्यांची ‘रांगोळी’
- टीम लोकमत, ठाणे
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला असतानाही ठाणे जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. काही पालिकांनी खड्ड्यांत तात्पुरती खडी भरण्यास सुरूवात केली आहे. मात्र पावसाच्या सरी आणि वाहनांच्या वर्दळीमुळे ती खडी लगेचच उखडून इतस्तत: पसरत असून गाड्या जाताच ती अंगावर उडत आहे. खड्डे, त्यातील पाणी, चिखल आणि खडीचा दुहेरी धोका निर्माण झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक महापालिकेने केलेली तरतूद पाहता नागरिकांकडून कररूपाने गोळा केलेले कोट्यवधी रूपये पुन्हा खड्ड्यांत जाण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील शहराचा परिसर, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, ग्रामीण भाग, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडीसोबतच मुरबाड-शहापूर तालुक्यातून माहिती घेतली असता सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य कायम असल्याचे दिसून आले. बाप्पाच्या स्वागतासाठी खड्डे असलेले रस्ते सज्ज आहेत. त्यातून कशीबशी वाट काढत मंडळे मूर्ती आणत आहेत. पण डुगडुगणाऱ्या मूर्तींना सावरताना कार्यकर्ते मेटाकुटीला आले आहेत.
गणपतीच्या आगमनापूर्वी खड्डे बुजवले जातील असे आश्वासन प्रत्येक पालिकेने दिले होते. मात्र अजूनही खड्डे पुरते बुजवलेले नाहीत. पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरूवात केल्याने खड्डे, त्यात साचलेल्या पाण्याने झालेला चिखल आणि खड्डे भरण्यासाठी टाकलेल्या खडीमुळे निर्माण झालेली नवी अडथळ््यांची शर्यत असे दृष्य जागोजागी आहे.
मुलाम्यानंतरही खड्डे कायम
ठाण्यात मॅरेथॉनच्या मुहूर्तावरखड्ड्यांना मुलामा देण्यात आला. मात्र ते रस्त अवघ्या पाच दिवसांत पुन्हा उखडले असून शहरात विविध ठिकाणी पुन्हा खड्डेच खड्डे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा, असे आदेश देणाऱ्या महापौर आणि स्थायी समिती सभापतींनाच प्रशासनाने केराचीच टोपली दाखवल्याची टीका होऊ लागली आहे. पालिकेच्या दप्तरी शहरात अवघे ११२ खड्डे असले तरी प्रत्यक्षात ही संख्या त्याही पेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचे चित्र प्रत्यक्ष पाहणीत दिसून येते आहे. जेट पॅचरचे तंत्र यंदाही अपयशी ठरले आहे.
खडी पुन्हा रस्त्यावर
डोंबिवलीतील रस्ते व विविध ठिकाणच्या चौकांत पडलेले खड्डे बुजवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने टाकलेली खडी आता रस्त्यावर इतरत्र पसरली आहे. मोठ्या वाहनांच्या टायरमुळे खडी उडत आहे, तर दुचाकींचे टायर सरकण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताची भीती आहे. या वर्षी खड्ड्यांत पडून तीन महिला व एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाले होते. तर, खड्ड्यांमुळे मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. खडीमुळे वाहनांची चाके सरकत आहेत.
ग्रामीण भागातही खड्डे
कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणारा कल्याण-मुरबाड मार्ग तसेच गोवेली-टिटवाळा, टिटवाळा-खडवली आणि टिटवाळा-उशीद या मार्गावर ५०० हून अधिक खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाही हे खड्डे न बुजवल्याने भक्तांना खड्ड्यातूनच गणेशमूर्ती घरी आणावी लागणार आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.