जव्हारमध्ये ‘आधार’साठी रांगा
By Admin | Updated: October 5, 2015 00:21 IST2015-10-05T00:21:35+5:302015-10-05T00:21:35+5:30
जव्हार तालुक्यात वर्षभरापासून आधारकार्ड केंद्र बंद झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विक्रमगड, मनोर येथे सुरू असलेल्या केंद्राकडे धाव घ्यावी लागत होती

जव्हारमध्ये ‘आधार’साठी रांगा
जव्हार : जव्हार तालुक्यात वर्षभरापासून आधारकार्ड केंद्र बंद झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विक्रमगड, मनोर येथे सुरू असलेल्या केंद्राकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र, शुक्रवारपासून जव्हार पंचायत समितीतील शेतकरी भवन येथे आधारकार्ड केंद्र सुरू केल्याने तेथे रांगा लागल्या आहेत.
जव्हार तालुक्याची लोकसंख्या जवळपास १ लाखांच्या घरात पोहोचली आहे. यापूर्वी जव्हार शहरामध्ये अवघी दोन केंद्रे होती. परंतु, तेथील काम संथ असल्याने अनेक आदिवासी बांधव वंचित राहिले होते. दरम्यानच्या काळात विक्रमगड आणि मनोर येथे आधारकार्ड केंद्र सुरू असल्याने येथील नागरिकांनी तेथे धाव घेतली. पण, दोनदोन दिवस फेऱ्या मारूनही काम होत नव्हते, पण आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत असे. सरकारने अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य केले होते. शिष्यवृत्ती, निराधार योजना, गॅसनोंदणी, अनुदानित रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी आधारकार्डची गरज असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आधारची वारंवार गरज भासते.
तालुक्यात आधारकार्ड केंद्र वर्षभरापासून बंद झाले होते. ते केंद्र पुन्हा सुरू करावे, याबाबत येथील नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी महसूल विभागाकडे निवेदन देऊन मागणी केली होती. याचीच दखल घेऊन जव्हार पंचायत समितीच्या शेतकरी भवनात केंद्र सुरू केल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या वेळी जव्हार पंचायत समितीच्या सभापती यांनी या केंद्राचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे. (वार्ताहर)