पावसाने दाणादाण
By Admin | Updated: September 21, 2015 03:40 IST2015-09-21T03:40:27+5:302015-09-21T03:40:27+5:30
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने दाणादाण उडून जनजीवन विस्कळीत झाले.

पावसाने दाणादाण
ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने दाणादाण उडून जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे लोकल गाड्यांंचे वेळापत्रकही कोलमडल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. गौरीपूजनासाठी नातेवाइकांकडे जाणाऱ्या प्रवाशांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल झाले.
या वेळी महिला प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. तर, अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या शाळेची भिंत कोसळली, तर ठाण्यात पाइपलाइनचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याची घटना घडली.
तर, शनिवारी मुरबाडनजीकच्या सिंगापूर येथे वादळी पावसात सुमारे पंचवीस ते तीस फूट अंतरावर उडून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग वाघ यांचे उपचारादरम्यान रविवारी निधन झाले. तर, इंदिरावाडी येथे एक महिला वाहून गेली आहे.
गणेशोत्सवाच्या या कालावधीतील पहिला रविवार सुटीचा असल्यामुळे नातेवाइकांसह मित्रमैत्रिणींकडे गणेशदर्शनासाठी जाणाऱ्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार मोठ्या प्रमाणात होते. परंतु, संततधार पावसामुळे त्यांचे हाल झाले. तर, सणासुदीच्या कालावधीत बाजारपेठेत सजलेल्या दुकानांमध्ये पावसामुळे ग्राहकांचा अभाव दिसून आला. रविवारी गौरीचे घराघरांमध्ये भक्तिभावे पूजनही करण्यात आले.
या सोहळ्यासह पाच दिवसांचे गणपती सोमवारी जाणार असल्यामुळे त्यांच्या विसर्जनापूर्वीची सत्यनारायण पूजाही बहुतांशी ठिकाणी पार पडली. मात्र, पावसाने त्यात व्यत्यय आल्यामुळे गणेशभक्तांमध्ये काही अंशी नाराजीचा सूर ऐकायला मिळाला. तर, दीर्घकाळापासून विसावा घेतलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाल्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर होण्याची चाहूल लागल्यामुळे शेतकऱ्यांसह ठाणेकरांनी समाधानही व्यक्त केले.
पावसाच्या या कालावधीत ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचा व्हॉल्व्ह पातलीपाडा परिसरात नादुरुस्त झाल्याची घटना घडली. काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तर, गटारांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे सतत ये-जा करणाऱ्या गणेशभक्तांचे ठाणे शहरात हाल झाले.