कोकणात या वेळी जास्त पाऊस

By Admin | Updated: May 12, 2016 02:04 IST2016-05-12T02:04:01+5:302016-05-12T02:04:01+5:30

प्राथमिक पूर्वानुमानानुसार राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जादा पाऊस पडण्याची शक्यता असून जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत पावसाचा जोर

Rainfall in Konkan at this time | कोकणात या वेळी जास्त पाऊस

कोकणात या वेळी जास्त पाऊस

ठाणे : प्राथमिक पूर्वानुमानानुसार राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जादा पाऊस पडण्याची शक्यता असून जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत पावसाचा जोर राहील, असे प्रादेशिक हवामान खात्याचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी बुधवारी ठाणे येथे सांगितले.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पालिका, नगर परिषदा तसेच विभागांना या वेळच्या पावसाचे भाकीत पाहता आपत्तीच्या दृष्टीने चांगले नियोजन करण्याचे निर्देशही दिले. शाळा-महाविद्यालयांतील एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांचादेखील आपत्ती निवारणात कसा सहभाग वाढेल, हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. ठाणे शहर व जिल्ह्यात अतिवृष्टीने यापूर्वीदेखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही इमारती ढासळून जीवितहानी झाली आहे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत २० ते २५ मेपर्यंत सर्व पालिका आणि नगर परिषदांनी आपल्या भागातील जीर्ण, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण करावे तसेच योग्य पद्धतीने नोटिसा द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
कल्याण-डोंबिवली परिसरात ३०० अतिधोकादायक इमारती असल्याची माहिती आयुक्त ई. रवींद्रन यांनी या वेळी दिली. तसेच एनडीआरएफचे पथक आपत्तीच्या वेळी अधिक लवकर कसे पोहोचेल, हे पाहण्याची सूचना त्यांनी केली.
भातसा परिसरात वायरलेस यंत्रणा
भातसा परिसरात वायरलेस यंत्रणा नसल्याने मोबाइलच्या रेंजवर अवलंबून राहावे लागते आणि पाणीसाठ्याची माहिती देण्यासाठी शहापूरला जावे लागते, असे या वेळी जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भातसा परिसरात तात्पुरत्या स्वरूपात अशी यंत्रणा बसवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
जिल्ह्यात पावसाळ्याच्या दरम्यान येणाऱ्या आपत्तीत सर्व पालिकांच्या नियंत्रण कक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी योग्य समन्वय ठेवावा तसेच कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपत्तीशी संबंधित अतिरंजित व चुकीच्या बातम्या जाणार नाहीत, याकडे लक्ष ठेवावे असे सांगितले.आसनगाव तालुक्यात एप्रिलअखेर तीव्र पाणीटंचाई भेडसावत असतानाच ११ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आगमन झालेल्या पावसाने ऐन उष्णतेत शहापूरकरांनी सुखद गारवा अनुभवला. तालुक्यातील किन्हवली परिसरातील अस्नोली, मालेगाव या परिसरांत सौम्य गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. सरपण, शेण, गुरांचा चारा भिजून चिंब झाल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, तरीही बळीराजाच्या लवकर आगमनाने शेतकरी सुखावला आहे.

Web Title: Rainfall in Konkan at this time