पालिका उद्यानात रेन वॉटर हार्वेस्टिंग
By Admin | Updated: February 13, 2017 04:59 IST2017-02-13T04:59:32+5:302017-02-13T04:59:32+5:30
मीरा रोडच्या शांती पार्कमधील उद्यानात भाजपा नगरसेविका दीपिका अरोरा यांच्या निधीतून मंजूर झालेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे

पालिका उद्यानात रेन वॉटर हार्वेस्टिंग
मीरा रोड : मीरा रोडच्या शांती पार्कमधील उद्यानात भाजपा नगरसेविका दीपिका अरोरा यांच्या निधीतून मंजूर झालेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे भूमिपूजन महापौर गीता जैन यांच्या हस्ते झाले. उद्यानात राबवला जाणारा मीरा-भार्इंदरमधील हा पहिलाच प्रकल्प आहे. भविष्यात या प्रकल्पातून उद्यानासाठी पाणी मिळणार असल्याने टँकरची गरज लागणार नाही.
तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांनी पाणीपुरवठा विभागाने नाहरकत दिलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांची पाहणी करून अहवाल मागवले होते. नगररचनाकार दिलीप घेवारे यांनीही बांधकाम परवानगीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अटीत सुधारणा करत स्वतंत्र टाकी व नळजोडण्या देण्याचे नमूद केले. पण, याची काटेकोर अंमलबजावणी केली जात नसल्याचे उघड झाले आहे.
मीरा रोडच्या शांती पार्क भागातील भाजपा नगरसेविका दीपिका अरोरा यांनी जुलै २०१६ मध्येच माधव टॉवरजवळ आरजीच्या जागेत पालिकेने विकसित केलेल्या उद्यानात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्याची मागणी पालिकेकडे केली होती. पाठपुराव्यानंतर तब्बल सात महिन्यांनी पालिकेने या कामासाठी कार्यादेश दिला. अरोरा यांनी निधी दिला असून पाच लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
पालिकेने उद्यान, मैदान, स्मशानभूमी, कार्यालय व शाळा येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा राबवली पाहिजे. त्यामुळे पाण्याची बचत होईल, असे अरोरा यांनी सांगितले. नैसर्गिक स्रोतांचे अधिकाधिक संवर्धन व वापर आपण केला पाहिजे, असे महापौर जैन म्हणाल्या. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)