विसर्जनाला पाऊसफुलांचाही वर्षाव

By Admin | Updated: September 22, 2015 03:43 IST2015-09-22T03:43:13+5:302015-09-22T03:43:13+5:30

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... पुढल्या वर्षी लवकर या... च्या गजरात ठाणे जिल्ह्यात सोमवारी सुमारे ५४ हजार गणरायांसह १७ हजार १६४ गौरार्इंचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

The rain shower also pours rain | विसर्जनाला पाऊसफुलांचाही वर्षाव

विसर्जनाला पाऊसफुलांचाही वर्षाव

ठाणे : गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... पुढल्या वर्षी लवकर या... च्या गजरात ठाणे जिल्ह्यात सोमवारी सुमारे ५४ हजार गणरायांसह १७ हजार १६४ गौरार्इंचे विधिवत विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, या वेळी अनेक गणेशभक्तांनी पर्यावरणीय दृष्टिकोन बाळगून कृत्रिम तलावात विसर्जनास पसंती दिली. दरम्यान, न्यायालयाच्या दट्ट्याचे पोलिसांनी चांगलेच पालन केल्याचे दिसून आले. सायलेन्स झोन परिसरात शांतता राखण्यात पोलिसांना काहीसे यश आले. संध्याकाळी पावसाने ठाण्यात दमदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गोवेली येथे विसर्जन तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला.
गुरुवारी प्रतिष्ठापना केलेल्या ५ दिवसांच्या गणरायाला सोमवारी भाविकांनी अत्यंत भक्तिभावाने निरोप दिला. शहरातील अनेक तलावांच्या ठिकाणी तसेच खाडीकिनारी निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन केंद्रांवर तसेच गणेशमूर्ती दान केंद्रांवर भाविकांनी आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले. अनेक स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक भाविकांनी कृत्रिम तलाव आणि मूर्तिदान केंद्रांचा वापर केला. पर्यावरणाच्या हानीसंदर्भात या वर्षी प्रथमच जनजागृती झाल्याचे दिसून आले.
ठाणे पोलीस आयुक्तालयात १२९ सार्वजनिक आणि ४४ हजार २८७ खासगी गणेशमूर्तींचे तर १३ हजार ९७८ गौरार्इंचे विसर्जन करण्यात आले. तर, ग्रामीण जिल्ह्यामध्ये २१० सार्वजनिक आणि ९ हजार ३१० खासगी गणेशमूर्तींचे तसेच ३ हजार १८६ गौरार्इंचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, या वर्षी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी ठाणे पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. एसआरपी, होमगार्ड, आणि इंडो तिबेटीयन पोलिसांच्या बंदोबस्तामुळे शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील अनेक सायलेन्स झोनच्या बाबतीत पोलीस अधिकच कार्यक्षम असल्याचे दिसून आले. अनेक सायलेन्स झोनच्या ठिकाणी तैनात केलेले पोलीस अधिकारी मिरवणुकांमधील बॅण्ड पथकाला वाद्य बंद करण्याच्या सूचना देत होते. विशेष म्हणजे न्यायालयाच्या दणक्यामुळे मिरवणुकांमधून डीजे हद्दपार झाल्याचे दिसून आले. तसेच मासुंदा तलाव, उपवन तलाव, रायलादेवी, नीलकंठ वुड्स, खारेगाव, पारसिक रेतीबंदर, कळवा खाडी, कोलशेत खाडी आदी ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची धूम दिसून आली.
भिवंडीत १०४५ गौरींसह ४३५० गणेशमूर्तींचे विसर्जन
भिवंडी : शहरातील विविध तलावांत ४३५० गणेशमूर्तींचे व १०४५ गौरींचे विसर्जन झाले. यामध्ये २३ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश होता. शेलार येथे कामवारी नदीत गणेशघाट व टिळकघाट येथे शहरातील बहुतांशी गणेशभक्तांनी मूर्तींचे विसर्जन केले. तर वऱ्हाळा तलाव, कामतघर व फेणे तलाव, टेमघर तलाव, नारपोली तलाव आदी ठिकाणी महानगरपालिकेने विसर्जनासाठी तराफा व जीवनरक्षक पथकाची सोय केली होती.
गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप
मुुंब्रा : पाहुणचाराकरिता आलेल्या गौरी तसेच मागील पाच दिवसांपासून भक्तांच्या पाहुणचाराने, भक्तिभावाने तृप्त झालेल्या मुंब्रा-कौसा परिसरातील ८७५ गणराय मूर्तींना येथील विसर्जन महाघाट तसेच विविध खाडीकिनारे आणि तलावांमध्ये पुढच्या वर्षी लवकर या... जयघोषात वाजतगाजत, टाळमृदंगाच्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला.
टाळमृदंगाच्या गजरात गौर आणि बाप्पाला निरोप
टिटवाळा : कल्याण ग्रामीण भागातील पाच दिवसांच्या बाप्पाला गौरी मातेसोबत जड अंत:करणाने साश्रुनयनांनी व भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप दिला. टाळमृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात गौरीमाता व गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील सार्वजनिक २६, घरगुती ६३४ व गणपतींपाठोपाठ पाहुण्या आलेल्या ३९८ गौरीमातांना निरोप देण्यात आला. फळेगाव येथील ओढा, खडवली भातसा नदी, पाचवा मैल घाट, रुंदे काळू नदीवर, गुरवली व टिटवाळ्याजवळ काळू नदी घाट, टिटवाळा हनुमान मंदिर तलाव, उतणे गाव तलाव येथे विसर्जन करण्यात आले.
टोकावडेत पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन!
तालुक्यात अतिउत्साहात गणेशोत्सव पार पडत असून आपल्या लाडक्या पाचदिवसीय बाप्पाला निरोप देण्यात आला. टोकावडे, मुरबाड, शिरोशी, तळवली, सरळगाव, शिवळे इत्यादी गावांसह संपूर्ण मुरबाड तालुक्यातून चार ते पाच हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.तालुक्यातील गावांमध्ये गणेश विसर्जन होत असताना कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, यासाठी मुरबाड व टोकावडे पोलीस धुमाळ, कोकाटे, बांगर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच डीजेच्या तालावर नाचत विसर्जन सोहळा पार पडला.

Web Title: The rain shower also pours rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.