उल्हासनगरात मटका जुगारावर धाड, २१ जणांवर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: June 25, 2023 18:11 IST2023-06-25T18:11:13+5:302023-06-25T18:11:28+5:30
रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरात मटका जुगारावर धाड, २१ जणांवर गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-३, अंबरनाथ-कल्याण रस्त्या शेजारील मटका जुगार अड्डा चालणाऱ्या गाळ्यावर मध्यवर्ती पोलिसांनी शनिवारी रात्री धाड टाकून तब्बल २१ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून गुन्हा दाखल केला.
उल्हासनगरात मटकी जुगार व ऑनलाईन जुगाराचे अड्डे सर्रासपणे सुरू असून याच जुगाराच्या वादातून कॅम्प नं-५ मध्ये एकाच गेल्या महिन्यात खून झाला. कॅम्प नं-३ अंबरनाथ-कल्याण रस्त्या लगत असलेल्या पांडे नावाच्या गाळ्यात मिलन बाजार, मेन बाजार, कल्याण ओपन नावाने मटका जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी रात्री ९ वाजता पोलीस पथकांनी धाड टाकून मटका खेळणाऱ्या तब्बल २१ जणांना अटक करून गुन्हा दाखल केला. संदीप गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार मटका जुगार अड्डा सुरू असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून पोलीस संदीप गायकवाड यांचा शोध घेत आहेत. जुगार अड्ड्यावरून रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.