नागरिकांना प्रवेश नाकारल्याने पालिकेत राडा
By Admin | Updated: August 31, 2016 03:05 IST2016-08-31T03:05:01+5:302016-08-31T03:05:01+5:30
दिवसभर पालिकेत सुरू असलेला राबता रोखत अधिकाऱ्यांना कामासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी नागरिकांना अवघा एक तास प्रवेश देण्यास सुरूवात केल्याने सुरूवात

नागरिकांना प्रवेश नाकारल्याने पालिकेत राडा
भाईंदर : दिवसभर पालिकेत सुरू असलेला राबता रोखत अधिकाऱ्यांना कामासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी नागरिकांना अवघा एक तास प्रवेश देण्यास सुरूवात केल्याने सुरूवात केल्याने सोमवारी भाईंदर पालिकेत राडा झाला. इतर वेळेत खु्द्द सभापतींनाच अडवण्यात आल्याने त्यांनी कारभारावर टीकास्त्र सोडले.
मीरा-भार्इंदर पालिकेने दुपारी २.३० ते ३.३० याखेरीज इतर वेळेत मुख्यालयात येणाऱ्यांना रोखण्यासाठी सोमवारपासून प्रवेशद्वारच बंद केल्याने काँग्रेसचे प्रभाग पाचमधील सभापती प्रमोद सामंत यांनी प्रवेशद्वाराजवळ गोंधळ घातला. उपद्व्यापी लोकांमुळे त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी मोकळा वेळ मिळावा, तसेच सतत ये-जा करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी नागरिकांना मुख्यालयात मर्यादित वेळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. यावर काहूर उठल्यावर नाराजांना पूर्णवेळ प्रवेश मंजुुर करण्यात आला. त्यावर कोणीही ब्र काढला नाही. यानंतर मुख्य प्रवेशद्वारासह प्रत्येक मजल्यावरील प्रवेशद्वाराजवळ बायोमेट्रिक हजेरीसाठी थम्ब इंम्प्रेशन यंत्रे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली. ते पूर्ण होताच काही काळ निश्चित वेळेतील प्रवेश सुरु झाला. मात्र सोमवारपासुन अचानक मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात निश्चित वेळेखेरीज बंद करण्यात आले. सामान्य नागरिकांना मुख्यालयाच्या आवारातच थोपवून धरण्यास आणि वेळेचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात झाली. कर भरणाऱ्यांना तळमजल्यावरील नागरी सुविधा केंद्रात, तर अर्ज देणाऱ्यांची मुख्यालयाबाहेर सोय करण्यात आली. प्रवेशद्वारच बंद झाल्याने काहींनी संताप व्यक्त केला. त्यातच प्रभाग सभापती प्रमोद सामंत दुपारी साडेतीननंतर मुख्यालयात आले असता त्यांना मुख्यालयाचे प्रवेशद्वार बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यातच आत जाण्यापासून रोखण्यात आले. सुरक्षारक्षकांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे लक्षात येताच सामंत यांनी प्रवेशद्वाराजवळच राडा केला.
युतीतील सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातुन प्रशासनाने हुकुमशाही सुरु केल्याचा आरोप केला. संतप्त सामंत यांनी महापौर गीता जैन यांची भेट घेत प्रशासनाची मुजोरी वाढल्याचे निदर्शनास आणले. मात्र महापौरांनी यावर प्रशासनाची बाजू घेत थातुर-मातुर उत्तर दिल्याचे सामंत यांनी सांगितले. महापौरांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. (प्रतिनिधी)