म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी जिल्हा रुग्णालयाबाहेर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:04+5:302021-05-25T04:45:04+5:30
ठाणे : कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. त्यासाठी लागणारी औषधे ही महागडी आहेत. या ...

म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी जिल्हा रुग्णालयाबाहेर रांगा
ठाणे : कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. त्यासाठी लागणारी औषधे ही महागडी आहेत. या आजाराच्या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने त्याचे इंजेक्शन जिल्हा रुग्णालयाकडे दिली आहेत. त्यानुसार सोमवारी जिल्हा रुग्णालयाला ४८० इंजेक्शन देण्यात आली. दरम्यान, हे इंजेक्शन आपल्या रुग्णाला मिळावे, यासाठी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाबाहेर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.
काेरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण होत आहे. मागील काही दिवसांपासून आतापर्यंत जिल्ह्यात ६५ हून अधिक रुग्ण आढळले असून, त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्यास डोळ्यांवाटे हा संसर्ग मेंदूमध्ये जाऊन रुग्ण दगावण्याची ही शक्यता असते. अशा रुग्णांवर उपचारासाठी ॲम्फोटेरेसीन हे इंजेक्शन वापरले जात आहे. या इंजेक्शनचाही काळाबाजार होऊ नये, यासाठी राज्य सरकार जिल्हा रुग्णालयामार्फत रुग्णांना या इंजेक्शनचा पुरवठा करीत आहे.
राज्य सरकारने ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाला ४८० इंजेक्शनचा साठा सोमवारी दिला होता. त्यामुळे हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय परिसरात रांगा लावल्या होत्या. रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार एकूण ७२ रुग्णांना ३६० इंजेक्शन दिले. एका रुग्णाला पाच इंजेक्शन देण्यात येतात. या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना बँकेत पैसे भरावे लागतात. त्यानंतर त्यांना हे इंजेक्शन दिले जाते, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
----------------------