विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाचा प्रश्न मार्गी
By Admin | Updated: March 21, 2017 01:50 IST2017-03-21T01:50:15+5:302017-03-21T01:50:15+5:30
ठाणे महापालिकेतील नवनिर्वाचित विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. सोमवारी झालेल्या महासभेत

विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाचा प्रश्न मार्गी
ठाणे : ठाणे महापालिकेतील नवनिर्वाचित विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. सोमवारी झालेल्या महासभेत विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांनीदेखील या दालनाच्या बाजूने झुकते माप दिल्याने अखेर प्रशासनाने नमते घेऊन सर्वानुमते पहिल्या मजल्यावर ते देण्याच्या मुद्यावर एकमत झाले. यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी या वादावरही पडदा पडला.
दुसऱ्या मजल्यावरील विरोधी पक्षनेत्यांचे दालन तळ मजल्यावरील काँग्रेस कार्यालयात हलवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, त्याचे कामही सुरू झाले होते. परंतु, हे केबिन स्वीकारणार नसल्याचे पत्र विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले होते. त्यानंतरही त्याचे काम सुरूच होते. यासंदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांनीदेखील पत्र देऊन दुसऱ्या मजल्यावर शक्य नसल्यास पहिल्या मजल्यावर त्यांना कार्यालय द्यावे, अशी मागणी केली. याचे पडसाद सोमवारच्या महासभेतदेखील उमटले.
विरोधी पक्ष नेते पाटील यांनी कार्यालयाचा मुद्दा उपस्थित करून दुसऱ्या मजल्यावरील कार्यालय हटवण्यामागची कारणे प्रशासनाला विचारली. तसेच मनमानी कारभारामुळे तळ मजल्यावर कार्यालय देणार असाल तर मुख्यालयात टेबलखुर्च्या मांडून उघड्यावरच कामकाज करू, असा इशारा दिला.
महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही विरोधी पक्षनेत्यांना जुनेच किंवा पहिल्या मजल्यावर कार्यालय देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर आणि शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के या दोघांनीही विरोधी पक्षाच्या मागणीप्रमाणे त्यांना कार्यालय देण्याची मागणी केली. अखेर, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पहिल्या मजल्यावर कार्यालय देण्यास संमती देऊन या वादावर पडदा टाकला. मनमानी कारभाराचा यात काहीच संबंध नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)