पाकला ‘दहशतवादी राष्ट्र’ घोषित करा

By Admin | Updated: April 23, 2017 04:05 IST2017-04-23T04:05:56+5:302017-04-23T04:05:56+5:30

पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. त्यासाठी दुसऱ्या देशांची वाट बघण्याची गरज नाही, असे परखड मत एअर मार्शल भूषण गोखले यांनी

Publish as 'Terrorist Nation' | पाकला ‘दहशतवादी राष्ट्र’ घोषित करा

पाकला ‘दहशतवादी राष्ट्र’ घोषित करा

ठाणे : पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. त्यासाठी दुसऱ्या देशांची वाट बघण्याची गरज नाही, असे परखड मत एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले. तसेच, पाकिस्तानबरोबर असलेले व्यापारी व्यवहारही थांबवावे, असेही ते म्हणाले.
गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या एकोणतिसाव्या अ.भा. सावरकर साहित्य संमेलनात शनिवारी ‘भारताची संरक्षण सिद्धता’ हा परिसंवाद झाला. त्यावेळी गोखले बोलत होते. ते म्हणाले की, देशात शांतता असल्याशिवाय प्रगती होत नाही. शांततेसाठी संरक्षण सिद्धताही लागते. आपल्या देशात शांतता आणि संरक्षण सिद्धता आहे, म्हणून आपली प्रगती होत आहे. शांतता आणि संघर्ष ही आजची गोष्ट नाही, तर रामायण-महाभारतापासून चालत आले आहे. ‘संरक्षणसेना’ या शब्दापेक्षा ‘सशस्त्रसेना’ हा शब्द मला योग्य वाटतो. कारण, ‘संरक्षण’ या शब्दात कमकुवतपणा जाणवतो. कोणत्याही देशांतील युद्ध हे त्या-त्या देशांनी अटींवर थांबवले पाहिजे. राजकारणी आणि संरक्षण दलात समन्वय असला पाहिजे. संरक्षण दलाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांनी १९६५ साली झालेल्या युद्धाच्यावेळी तसे स्वातंत्र्य दिले होते. यामुळे सैन्याचे मनोबल वाढते. सैन्याचे नैतिक बळ वाढवण्यासाठी तसे नेतृत्व असले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, कारगीलच्या युद्धात वापरण्यात आलेली युद्ध साधनसामग्री ही आपल्याला आयात करावी लागली होती. त्यामुळे आपले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपण ‘मेक इन इंडिया’वर भर दिला पाहिजे. आपल्याकडे केमिकल, बायोलॉजिकल शस्त्रे होती, परंतु आपण ती नष्ट केली. हवाईदल, भूदल आणि नौदल यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे आणि याची प्रचीती कारगील युद्धात आली. आपत्कालीन व्यवस्थापनेत तिन्ही दल हे तत्पर सेवा देत आहेत. माध्यमांनीदेखील स्वत:च लक्ष्मणरेखा आखल्या पाहिजे. नकारात्मक बातम्या पसरवू नये. मुंबई हल्ल्यात याचा अनुभव आला होता, असेही ते म्हणाले. आपल्याला कोणत्याही देशाच्या धमकीला घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाने सैनिकासारखे सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कमांडर सुबोध पुरोहित यांनी नौदलाची माहिती दिली. ते म्हणाले, या सेवेबद्दल फार कमी माहिती असते. आपला मुख्य व्यापार हा समुद्रमार्गाने होत असतो. नौदल हे दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध चांगले टिकवू शकते. नौदलाचे कार्यक्षेत्र फार मोठे आहे, हे सांगताना त्यांनी या सेवेच्या मुख्य शाखांची माहिती दिली. इंडोनेशिया, मलेशिया, बांग्लादेश, म्यानमार, थायलंड या पाच देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानचे नौदल हे आपल्यापेक्षा छोटे आहे. सागरीमार्गाने पाकिस्तानसोबत आपली लढाई झाली, तर आपण नक्की जिंकू. चीनचे नौदल हे आपल्यापेक्षा तिप्पट आहे. चीनने आक्रमण करायचे ठरवले, तर त्यांना समुद्रमार्गाने आक्रमण करणे कठीण आहे. चीनकडून तसा धोका कमी असला, तरी गाफील राहून चालणार नाही. पाकने सागरीमार्गाने हल्ला केला, तर आपण बलाढ्य असल्याने त्यांना चोख उत्तर देऊ, असे पुरोहित म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Publish as 'Terrorist Nation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.