पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे तिसरे पुष्प
By Admin | Updated: November 14, 2016 04:12 IST2016-11-14T04:15:04+5:302016-11-14T04:12:12+5:30
संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे तिसरे पुष्प गुंफले, ते ‘रानी की बाव’ या नृत्याविष्कार आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त

पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे तिसरे पुष्प
ठाणे : संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे तिसरे पुष्प गुंफले, ते ‘रानी की बाव’ या नृत्याविष्कार आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्र माने. या दोन्ही कार्यक्रमांनी रसिकांची मने जिंकली. या महोत्सवाच्या पहिल्या सत्रात मुक्ता जोशी आणि नृत्यधारा यांनी बसवलेला ‘रानी की बाव’ हा संगीतनृत्याचा कार्यक्र म सादर झाला.
लोकांना अजूनही फारसे परिचित नसलेले ‘रानी की बाव’ हे समृद्ध प्राचीन वारसा असलेले गुजरातमधील पाटणजवळील ठिकाण. अजिंठा-वेरूळ, खजुराहो यांच्या तोडीचे. येथे जमिनीखाली सात मजले असलेले अप्रतिम शिल्प आहे. १९८६ साली एका गुराख्याच्या सतर्कतेने या मंदिराचा शोध लागला. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून या मंदिराला स्वीकारले आहे. सोलंकी घराण्यातील राणी उदयमती हिने एक हजार वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या, राजा भीमदेवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे जमिनीखालील मंदिर घडवले. नृत्यधाराच्या कलाकारांनी आपल्या नृत्यनाट्यातून हे मंदिर घडवण्याची प्रक्रिया आणि त्याचबरोबर या मंदिराचे सौंदर्य-नजाकत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. यासाठी स्लाइड-शो, व्हिडीओ फिल्म यांचा समर्पक वापर केला होता. एखादी फारशी परिचित नसलेली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नृत्यनाट्य हे किती प्रभावी माध्यम आहे, याची प्रचीती कलाकारांनी आणून दिली.
दुसऱ्या सत्रात पलुस्कर यांच्या जीवनाचा प्रवास उलगडण्यात आला. उणेपुरे ३५ वर्षे आयुष्य लाभलेल्या पलुस्करांनी अल्पवयातच भारतभर कीर्ती मिळवली. बैजू बावरा चित्रपटाने त्यांना कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांच्या जीवनावर आधारित या कार्यक्र मामुळे रसिकांना जुना ठेवा अनुभवण्याची संधी मिळाली. (प्रतिनिधी)