पाणीयोजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी तरतूद हवी
By Admin | Updated: March 10, 2017 04:11 IST2017-03-10T04:11:28+5:302017-03-10T04:11:28+5:30
ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी मिळते. परंतु गळती, पाणी चोरी, आणि नियोजनाच्या अभावामुळे मुबलक पाणी असूनही काही भागांना वणवण भटकावे लागते.

पाणीयोजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी तरतूद हवी
ठाणे : ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी मिळते. परंतु गळती, पाणी चोरी, आणि नियोजनाच्या अभावामुळे मुबलक पाणी असूनही काही भागांना वणवण भटकावे लागते. ते रोखायचे असेल तर पाणी योजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी अपेक्षा ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे माजी मुख्य अधिकारी गिरीश मेहेंदळे यांनी व्यक्त केले.
गळती रोखावी, मीटर पध्दतीने पाणीपुरवठा सुरु करावा. वॉटर, एनर्जी आॅडिटची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, असा आग्रहही त्यांनी धरला.
पालिकेने पाणीबिलाची वसुली मीटरप्रमाणेच करावी. मीटर पद्धतीमुळे पाण्याच्या नियोजनास मदत होईल. याशिवाय पाणी येते किती, वापरले जाते किती, याचे नोंद सुरू करावी. एकूणच पाण्याचे मोजमाप होणे गरजेचे असण्यावर त्यांचा भर होता. पाणी बिलाच्या वसुलीचे कामही पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून न करता किंवा पाणी मीटरचे काम, वॉटर आॅडिट, एनर्जी आॅडिट हे पालिकेकडून न करता ते आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून केल्यास त्यामुळे उत्पन्न वाढेल; शिवाय पाण्याच्या नियोजनास मदत होईल, असे मेहेंदळे म्हणाले.
पाणीपुरवठा विभागाला देखभाल दुरुस्तीसाठी निधी लागतो. त्याची तरतूद अर्थसंकल्पात नसते. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी त्यासाठी भरीव तरतूद केल्यास दुरुस्तीची कामे वेळेत होऊन गळतीचे प्रमाण रोखण्यास मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
धरणाचा प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळत पडला आहे. त्याचा वाढलेला खर्च पाहता आता पालिकेला हे धरण बांधणे शक्य नाही. त्यामुळे हे काम राज्य सरकारमार्फतच करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी मांडले. पाणीपुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची उणीव भरुन काढण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
पुरवठ्याचे नियोजन हवे : पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन हवे. कोणत्या भागाला महत्व दिले पाहिजे, कोणत्या भागाला कमी महत्व दिले जाणे अपेक्षित आहे, याचाही अभ्यास पुरवठ्यावेळी करणे गरजेचे आहे. या सर्वांसाठी निधी मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून फक्त उत्पन्नाची आशा न ठेवता, त्यांच्यासाठी विशेष तरतूदही करणे अपेक्षित आहे, असा आग्रह त्यांनी धरला.