खड्डे बुजवण्यासाठी १२ कोटींची तरतूद, स्थायी समितीत मुद्दा गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 04:19 IST2018-04-14T04:19:04+5:302018-04-14T04:19:04+5:30
कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांमधील चरी भरण्याच्या कामासाठी १५ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासनाने जानेवारीत मंजुरी दिली आहे.

खड्डे बुजवण्यासाठी १२ कोटींची तरतूद, स्थायी समितीत मुद्दा गाजला
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांमधील चरी भरण्याच्या कामासाठी १५ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासनाने जानेवारीत मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा खड्डे भरण्यासाठी १२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण केल्यावर खड्डे बुजवण्यावरील खर्च वाचेल, असा दावा महापालिकेकडून केला जात होता. मात्र, तो फोल ठरला आहे.
पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यानंतर आणि वर्षभर खड्डे भरण्यासाठी महापालिकेने १२ कोटींची तरतूद केली आहे. प्रशासनाने या खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र, महापालिकेच्या स्थायी समितीने जानेवारीत रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या चरी भरण्यासाठी १५ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीवर एकूण २७ कोटी रुपये खर्च येणार आहे. इतका मोठा खर्च करून खड्डे बुजवले जाणार नसतील तर हा पैसा जातो कुठे?, त्याच्या नोंदी कशा ठेवल्या जातात, केवळ काम झाले असे भासवले जाते का, असा मुद्दा शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला.
त्यावर शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी म्हणाले, खड्डा बुजवला की, त्याचा गुगल मॅप घेतला जातो. त्याठिकाणची इमेज काढून त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाच्या योग्य प्रकारे नोंदी ठेवल्या जात नाहीत, हा आराप चुकीचा आहे. खड्डे भरण्याच्या कामाचे लेखा परीक्षण होते. त्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी दोन अभियंत्याची नेमणूक केली होती. त्यांच्या अहवालानंतर काम योग्य झाले आहे का, गुणवत्ता राखली गेली आहे का, याची शहानिशा करूनच कंत्राटदाराला बिले दिली जातात, असे सांगितले. त्यावर मागील वर्षीच्या कंत्राटदाराला अजूनही बिले दिलेली नाहीत, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ४०२ कोटी खर्चून काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यावेळी हे रस्ते केल्यास खड्डे बुजवण्यास येणारा खर्च वाचेल, असे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतरही खड्ड्यांवर खर्च होत आहे.
>अन्यथा परिस्थिती बिकट
२७ गावांतील रस्ते अत्यंत खराब आहेत. त्यावर पॅच वर्क करावे लागणार आहे. अन्यथा पावसाळ्यात तेथील परिस्थिती अधिक बिकट होईल, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.