प्रांत अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन, उल्हासनगरात ३० जूनपर्यंत मिळणार सनद!
By सदानंद नाईक | Updated: June 14, 2023 18:43 IST2023-06-14T18:42:43+5:302023-06-14T18:43:13+5:30
आतापर्यंत ३५ हजार जणांना सनद देण्यात आल्या असून ५ हजार सनद देणे बाकी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रांत अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन, उल्हासनगरात ३० जूनपर्यंत मिळणार सनद!
उल्हासनगर : शहरातील १९६५ पूर्वीचा पुरावा व इतर कागदपत्र देणाऱ्यांना जागेची सनद देण्यात येणार असून ३० जून पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन शासन आदेशानुसार प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी केले. आतापर्यंत ३५ हजार जणांना सनद देण्यात आल्या असून ५ हजार सनद देणे बाकी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
देशाची फाळणी झाल्यानंतर विस्थापित झालेल्या बहुसंख सिंधी समाजाला कल्याण जवळील ब्रिटिशकालीन बरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून विस्थापिताच्या वस्तीला उल्हासनगर नाव देण्यात आले. सुरवातीला उल्हासनगरची लोकसंख्या ९५ हजार होती. ती आता ९ लाखा पेक्षा जास्त झाली आहे. केंद्र शासनाने जमिनीची मालकी राज्य शासनाकडे हस्तांतरण केले. त्यानंतर जागेची मालकी हक्क (सनद) देण्यासाठी राज्य शासनाने, सन १९६५ पूर्वीचा पुरावा व इतर कागदपत्र मागितले असून आज पर्यंत ३५ हजार पेक्षा जास्त जणांना जागेची मालकी म्हणजे सनद प्रांत कार्यालयाकडून देण्यात आली. ज्या नागरिकडे जागेचा पुरावा व इतर कागदपत्र आहेत. त्यांनी ते ३० जून पूर्वी प्रांत कार्यालयात विशिष्ट नमुन्यात पोच करावी. असे आवाहन शासनाच्या निदर्शनानुसार प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे.
शहरातील जागेवर वर्षांनुवर्ष राहणाऱ्या नागरिकांनी जागेची मालकीहक्क (सनद) घेऊन जावे. त्यासाठी शासन नियमानुसार प्रांत कार्यालयाकडे अर्ज करून जागेवर कब्जाचे कागदपत्र सादर करावे. जागेची मालकीहक्क प्रकार निकाली काढण्यासाठी शासन आग्रही असल्याचे प्रांत अधिकारी।कारभारी यांनी सांगितले. ५ हजार जणांना अद्यापही सनद देणे बाकी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रांत कार्यालयाच्या वतीने राहत्या जागेची व खुल्या मात्र ताबा असलेल्या जागेची सनद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रांत कार्यालयाच्या आदेशानंतर अनेकांनी जागेच्या सनदसाठी अर्ज आल्याचे उघड झाले. ३० जून पर्यंत नागरिकांनी सनद साठी अर्ज करण्याचे आवाहन प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे.
जागेला आला सोन्याचा भाव
शहरात जागेला सोन्याची किंमत आल्याने, भूमाफियांची खुल्या जागा, शाळा मैदानझ समाजमंदिर, शासकीय जागा आदिवर नजर आहे. महापालिका शाळेच्या मैदानावर एका सामाजिक संस्थेने सनद काढल्याचा प्रकार सध्या गाजत आहे. हे टाळण्यासाठी जागेला सनद देतांना प्रांत कार्यालयाला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.