जांभूळ गावात मिळणार 60 भिकाऱ्यांना रोजगार, शासनाकडून दीड कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:17 AM2020-12-12T00:17:35+5:302020-12-12T00:18:10+5:30

Thane News : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये असलेल्या जांभूळ गावातील  ६५ एकर पडीक जमीन आता वर्षभरात भातशेती, फळबागा, फुलबागा, मस्त्यशेतीने बहरणार आहे.

provide employment to 60 beggars in Jambul village | जांभूळ गावात मिळणार 60 भिकाऱ्यांना रोजगार, शासनाकडून दीड कोटींचा निधी

जांभूळ गावात मिळणार 60 भिकाऱ्यांना रोजगार, शासनाकडून दीड कोटींचा निधी

Next

- अजित मांडके

ठाणे : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये असलेल्या जांभूळ गावातील  ६५ एकर पडीक जमीन आता वर्षभरात भातशेती, फळबागा, फुलबागा, मस्त्यशेतीने बहरणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा महिला बालविकास विभागाने हे पाऊल उचलले आहे. 
११ नोव्हेंबरला या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. जमिनीची मशागत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यानुसार, या ठिकाणी ६० भिकाऱ्यांना रोजगाराची संधी दिली जाणार आहे. त्यासोबतच येथे शेतीची अत्याधुनिक यंत्रेही  दिली गेली आहेत. ज्याचा येथील स्थानिक शेतकऱ्यांना लाभ होणार असून, त्यांना बाजारपेठही उपलब्ध केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हा  उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी शासनाने दीड कोटींचा निधी दिल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

काय काय असेल ६५ एकर जमिनीत 
६५ एकरच्या जागेत दोन शेततळी आहेत. या ठिकाणी एका तळ्याचे पाणी हे भातशेती, फळबाग, फुलबागांसाठी वापरले जाणार आहे. दुसऱ्या तळ्यात मत्स्यव्यवसाय केला जाणार आहे, तर ४० एकर जागेत भातलागवड केली जाणार आहे. तीन ते चार प्रकारचा भात येथे घेतला जाणार आहे. २० बाय २० च्या जमिनीत हॉटेलमध्ये जो काही भाजीपाला लागतो, तो येथे पिकवला जाणार आहे. यामध्ये लाल शिमला, मशरूम आदींसह इतर भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे. याशिवाय केरळमधील पोलाची जातीचे ५०० नारळ येथे लावले जाणार आहेत. सध्या या जमिनीत आंब्याची झाडे लावली आहेत.

स्थानिकांना मिळणार रोजगार आणि शेतीची यंत्रे
स्थानिकांना या ठिकाणी रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, शिवाय त्यांना शेतीसाठी जी काही भातकापणी यंत्रे, मळणी यंत्रे, ट्रॅक्टर त्यांच्या शेतात मोफत वापरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक समिती नेमली असून, त्याद्वारे काम सुरू झाले आहे आणि लवकरच हे पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित केले जाणार आहे.
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे 

६५ एकरच्या जागेत विविध प्रकारची भातशेती, फळबागा, फुलबागा, भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे. यासाठी एका संस्थेची निवड केली आहे.
    - महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

Web Title: provide employment to 60 beggars in Jambul village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.